३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्कॉटलंडला विजयाचे सूर

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
बोस्टन,
fifa world cup 2026 फिफा विश्वचषक २०२६ मध्ये स्कॉटलंडने तब्बल ३६ वर्षांनंतर विजयाची चव चाखत इतिहास रचला आहे. गट ‘क’ मधील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने हैतीचा १-० असा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार ठरला अनुभवी खेळाडू जॉन मॅकगिन, ज्याच्या एका निर्णायक गोलने स्कॉटलंडला संस्मरणीय यश मिळवून दिले.
 
fifa world cup 2026
 
बोस्टनमधील जिलेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. मात्र कालांतराने स्कॉटलंडने चेंडूवरील नियंत्रण वाढवत हैतीवर दबाव निर्माण केला. कर्णधार स्कॉट मॅकटोमिनेने सुरुवातीला गोल करण्याच्या काही संधी निर्माण केल्या, पण त्याचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत.
 
पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात स्कॉटलंडला अखेर यश मिळाले. एका जलद चालीदरम्यान चे ॲडम्स आणि बेन गॅनन-डोक यांच्या समन्वयातून चेंडू जॉन मॅकगिनकडे आला. मॅकगिनने बॉक्सच्या बाहेरून मारलेला जोरदार फटका बचावपटूला स्पर्श करत थेट जाळ्यात जाऊन विसावला. हा गोलच अखेर सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. या गोलसह ३१ वर्षीय जॉन मॅकगिनने वैयक्तिक विक्रमही आपल्या नावावर केला. फिफा विश्वचषकात स्कॉटलंडसाठी गोल करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. याआधी हा विक्रम दिग्गज केनी डलग्लिश यांच्या नावावर होता.
 
गोल स्वीकारल्यानंतर हैतीने पुनरागमनासाठी जोरदार प्रयत्न केले. काही वेळा त्यांनी स्कॉटिश बचावफळीची कसोटीही पाहिली, मात्र गोलरक्षक अँगुस गन आणि बचावपटूंनी संयमी खेळ करत प्रत्येक हल्ला परतवून लावला. दुसऱ्या सत्रातही स्कॉटलंडला आघाडी वाढवण्याच्या काही संधी मिळाल्या, परंतु त्यांना दुसरा गोल करता आला नाही.
 
सामन्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत हैतीने बरोबरीसाठी प्रयत्न सुरू ठेवले, मात्र स्कॉटलंडने एक गोलची आघाडी कायम राखत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. १९९० नंतरचा हा त्यांचा पहिला विश्वचषक विजय असून १९९८ नंतर प्रथमच विश्वचषकात खेळणाऱ्या स्कॉटलंडसाठी हा क्षण विशेष ठरला आहे. या विजयासह स्कॉटलंडने गटात अव्वल स्थानही पटकावले आहे.