गोपाळगड : उपेक्षेकडून उद्धाराकडे

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
रोखठोक 
दिनेश गुणे  
gopalgad killa परिस्थितीमुळे किंवा कळत, नकळत माणसाकडून कितीही मोठी चूक झाली किंवा कोणावर अन्याय झाला, तरीही पश्चात्ताप किंवा संयमाच्या बळावर ती चूक सुधारणे शक्य असते, आणि अन्यायग्रस्तास मुक्ती मिळते, असा संदेश देणाऱ्या अनेक रूपक कथा पुराणात आहेत. आताच्या जमान्यात अशा कथांवर किंवा त्यांमागील रूपकांच्या वास्तवावर विश्वास ठेवला जाईलच असे नाही, पण काही गोष्टींचा पुनर्प्रत्यय येतो, तेव्हा रूपकांचा वास्तविक अनुभवदेखील येतो. समाज कोणासही कायमचे दुर्लक्षित ठेवत नाही, प्रत्येक दुर्लक्षित, उपेक्षिताला न्याय मिळतो आणि परिवर्तनाची वाटदेखील सापडते. मात्र, अशा उपेक्षितांस सहानुभूतीच्या आणि आपुलकीच्या भावनेची आणि स्पर्शाची प्रामाणिक गरज असते, हा काही पुराणकथांनीच समाजास दिलेला संस्कार असतो. रामायणातील अहिल्येची कथा ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत भावुक, संवेदनशील आणि मानवी स्वभावाचे पैलू उलगडून दाखविणारी अशीच एक रूपक कथा आहे. या कथेत केवळ शाप, उःशाप आणि मोक्ष, मुक्तीचा प्रवास नाही, तर त्यामागेही असाच संदेश संस्कृतीने समाजास दिलेला आहे.
 
 
Gopalgad
 
 
अहिल्या नावाची एक गुणी स्त्री एका मोहाच्या क्षणी समाजास मान्य नसलेल्या काही गैरप्रकारात नकळत फसली, आणि तिच्या संतप्त पतीने दिलेल्या शापामुळे चेतनाहीन अवस्थेत शिळा होऊन दुर्लक्षित झाली, असा या कथेचा सारांश आहे. अर्थात, ही नकळत घडलेली फसगत तिने प्रामाणिकपणे पतीला पटवून दिल्यानंतर माणुसकी आणि संवेदना जिवंत असलेल्या तिच्या पतीने तिला उद्धाराचा उःशापही दिला, आणि विष्णुचा अवतार असलेल्या श्रीरामाचा चरणस्पर्श झाल्यास उद्धार होऊन अहिल्येस पूर्वीचे रूप पुन्हा प्राप्त होईल, असा दिलासाही दिला. काही युगांनंतर वनवासाच्या काळात प्रभू श्रीरामांना एका प्रवासात एका निर्जन, उजाड ठिकाणी दुर्लक्षित स्थितीत पडलेली ही शिळा दिसली, आणि उत्सुकतेने या पाषाणाची पूर्वकथा जाणून घेत त्यांनी त्या दुर्लक्षित ठिकाणास स्पर्श केला. काही क्षणांतच, त्या शिळेचा उद्धार उद्धार होऊन ते उजाड ठिकाण पुन्हा चैतन्याने फुलले. अहिल्या नावाच्या रूपकात्मक नायिकेस पुन्हा संजीवनी प्राप्त झाली. ही कथा म्हणजे केवळ चमत्काराच्या अंधविश्वासास खतपाणी घालणारी पुराणकथा नाही, हे त्यामागील रूपके समजावून घेतल्यास स्पष्ट होते, आणि त्यामागील मानवी जीवनासाठी अत्यंत मोलाचा असलेला संदेशही समजून येतो. या कथेतील ही नायिका, जिला सामान्यपणे अहिल्या असे म्हटले जाते, ती मुळात ङ्कअहल्याङ्ख आहे. नापीक, उजाड, दुर्लक्षित आणि जिथे कधीही कोणतेच पीक घेतले गेलेले नाही, जी कधीच नांगरली गेली नाही, अशा जमिनीस अहल्या म्हटले जाते. (हल म्हणजे नांगर. ज्या जमिनीस नांगराचा स्पर्श झाला नाही, अशी दुर्लक्षित जमीन म्हणजे अहल्या!)ः श्रीरामांनी वनवासाच्या काळात अशा उपेक्षित जमिनीवर शेती फुलविली, पिके घेतली, म्हणून त्यांच्या स्पर्शाने उजाड रूपातील त्या अहल्येचा उद्धार झाला, असा या कथेचा संदेश आहे असेही मानले जाते. समाजाने नाकारलेल्या किंवा उपेक्षित असलेल्या कोणत्याही गोष्टींचा पुन्हा तिची प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल, तर समाजानेच केलेल्या दुर्लक्षातून सुरू झालेल्या उपेक्षेचे प्रायश्चित्त घ्यावे लागते. अहल्येच्या कथेत, तिचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामाने पुढाकार घेतला.
 
 
आजही, कोणते तरी निमित्त घडावे, आणि आपला उद्धार व्हावा या अपेक्षेने अशा अनेक उपेक्षित बाबी दीर्घकाळ प्रतीक्षेत असतात. कदाचित, त्यांची दुर्लक्षित स्थिती हा त्यांच्याकडून किंवा अन्य कोणत्या तरी कारणाने कळत नकळत घडलेल्या चुकीसाठी मिळालेला शाप असेल, तर त्यांनादेखील अहल्येप्रमाणे उःशाप मिळालेला असणार, यावर विश्वास ठेवायला हवा. कारण, अशा घटना आजही आसपास घडतात, आणि अनेक वर्षे उपेक्षित, दुर्लक्षित राहिलेल्या बाबींच्या उद्धारासाठी मुहूर्त मिळतो. तसे नसते, तर केवळ जमिनीवर पडलेले दोन आंबे पर्यटकांनी उचलल्याचे निमित्त होऊन इतिहासातील एका उपेक्षित वास्तूच्या उद्धारासाठी सरकार सरसावले ही बाब कोणास पटली असती का? अहल्येच्या कथेतील त्या दुर्लक्षित जमिनीचा उद्धार करण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या स्पर्शाचे निमित्त घडले, त्या पुराणकथेची पुनरावृत्ती वाटावी अशीच घटना आपल्या अगदी आसपास, महाराष्ट्राच्या कोकणप्रांतात, रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागरजवळील अंजनवेल नावाच्या एका गावानजीक घडली आहे, आणि अनेक वर्षे उपेक्षित अवस्थेत राहिलेल्या एका ऐतिहासिक वास्तूच्या उद्धाराची प्रक्रिया सुरूदेखील झाली आहे. अंजनवेलजवळच्या गोपाळगड नावाच्या एका ऐतिहासिक गडाची ही कहाणी आहे. तटबंदी, बुरूज, आणि इतिहासाच्या खाणाखुणा अंगावर स्पष्ट उमटलेल्या असतानाही, कोणाच्या तरी कागदी मालकीच्या ओझ्याखाली दबून राहिलेला हा गड, उद्धाराच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे दुर्लक्षित अवस्थेत पडून राहिलेला होता. त्या ठिकाणी फिरणाऱ्या पर्यटकांच्या भेटीत घडलेल्या एका कारणामुळे गडाच्या इतिहासावर चढलेली उपेक्षेची आणि दुर्लक्षाची पुटे पुसली गेली आहेत. गडाच्या परिसरातील एका झाडावरून जमिनीवर पडलेले दोन आंबे काही पर्यटकांवर उचलले, आणि त्या झाडाच्या मालकीचा मुद्दा समोर आला. इतिहासातील या उपेक्षित वास्तूच्या उद्धाराचे हे निमित्त म्हणावयास हवे. गेल्या महिन्यात मुंबईजवळच्या बदलापूरहून पर्यटनासाठी कोकणात गेलेले काही पर्यटक गोपाळगड पाहावयास गेले असताना गडाच्या परिसरातील झाडावरून पडलेले दोन आंबे त्यांनी उचलले. यावरून गडावर मालकीचा हक्क सांगणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना हटकले. त्यातून काहीशी वादावादीही झाली, आणि गडावर हक्क सांगणाऱ्या त्या व्यक्तीने गडाचा दरवाजा बंद करून त्यांना डांबून ठेवण्याचाही प्रयत्न केला, असे सांगण्यात येते. या प्रसंगांचे कोणीतरी मोबाईलवर चित्रीकरण केले आणि समाजमाध्यमांवर ते प्रसारित होताच, जोरदार खळबळ माजली. उपेक्षित अवस्थेतून गडाचा उद्धार होण्याच्या प्रक्रियेचा बहुधा हा प्रारंभ ठरला. दोन आंब्यांच्या वादातूनन आता गडाच्या मालकीचा, इतिहासाचा आणि भविष्याचा संपूर्ण फैसला होणार आहे. कारण, या गडाची जागा सुमारे ६५ वर्षांपूर्वी सरकारी लिलावाच्या प्रक्रियेतून विकत घेतल्याचा संबंधिक मालकी सांगणाऱ्या व्यक्तीचा दावा आहे. इतिहासाच्या खाणाखुणा अंगावर मिरविणाऱ्या परंतु सरकारी कागदपत्रांच्या गुंत्यात अडकल्याने लिलावातून कोणाच्या तरी मालकीचे ओझे मिरवण्याची वेळ आलेला हा गड तेव्हा २२० ते ३०० रुपयांत या कुटुंबाने विकत घेतला, आणि गडाच्या मालमत्तेच्या सातबारावर या कुटुंबाचे नाव लागले. त्यानंतर गडावरील जागेत आमराईची लागवड करण्यात आली. ऐतिहासिक पुराव्यांच्या काही खाणाखुणा बुजविल्या गेल्या, अवजड यंत्रसामग्रीची घरघर गडाच्या शांततेला आव्हान देऊ लागली, प्रवेशद्वारावर खाजगी मालकीचा आणि प्रवेशबंदीचे फलक लागले असा दुर्गप्रेमींचा आरोप आहे.
 
 
केवळ जमिनीचा तुकडा किंवा झाडावरच्या आंब्यांच्या मालकीपुरता हा वाद आता मर्यादित राहिलेला नाही. त्याला आता संवेदनशील स्वरूप प्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जवळचे नाते सांगणारा हा किल्ली सरकार लिलावात विकून टाकते आणि एक कुटुंब त्यावर आपली कागदोपत्री मालकी प्रस्थापित करून इतिहासापासून गडाचे वर्तमान पुसून टाकले जाते, याबाबत शिवप्रेमी आणि इतिहासाच्या अभिमानी गटांमध्ये नाराजी आहे. शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले गडकिल्ले खाजगी मालकीचे कसे असू शकतात, आणि शिवप्रेमींना प्रवेशास मज्जाव कसा केला जातो, हा प्रश्न तेथील दुर्गप्रेमींना उपस्थित केल्यानंतर आता राज्य सरकारने यामध्ये लक्ष घातले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी या प्रश्नांची पार्श्वभूमी जाणून घेतली. संबंधितांसमवेत एक बैठक घेतली, सद्यस्थिती जाणून घेतली आणि वास्तवाचा अहवालही मागविला. हा आढावा पूर्ण झाल्यानंतर आणखी काही दिवसांत या वादाचे अन्य काही कंगोरे उघड होतील, आणि या उपेक्षित गडाच्या उद्धारासाठी सरकार कोणती पावले उचलणार हेही स्पष्ट होईल. या प्रश्नाचे राजकारणदेखील होईल, आरोप-प्रत्यारोपही होतील, आणि सत्ताधारी-विरोधकांमध्ये कलगीतुराही रंगेल. रत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी तसेच भाजपचे विधान परिषदेतील नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी या प्रश्नांत लक्ष घातले आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आणि पुरातत्व विभाग यांच्याशी समन्वय साधून किल्ला सरकारच्या ताब्यात घेण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली आहे. कोणत्या तरी प्रशासकीय त्रुटीमुळे दुर्लक्षाचे कारण ठरलेल्या या उपेक्षित वास्तूच्या उद्धाराची वेळ आता आली असून, त्यास कारणीभूत ठरलेल्या चुकांचे प्रायश्चित्त घेण्याची तयारीही सुरू झाली आहे, म्हणून अहल्या उद्धाराच्या पुराणकालीन रूपक कथेशी गोपाळगडाच्या वर्तमानात वास्तव मिळतेजुळते ठरते.
 
 
गोपाळगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील वशिष्ठी नदीच्या खाडीकाठचा इतिहासकालातील एक महत्वपूर्ण जलदुर्ग आहे. १६६० च्या सुमारे छत्रपती शिवाजी महाराजांनी तो आदिलशहाकडून विकत घेतला आणि त्याची डागडुजी करून बळकटीकरण केले. पश्चिम किनारपट्टीवरील मराठा आरमाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुढे हा किल्ला तुळाजी आंग्रे यांच्या आरमारी व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग बनला. १६९९ च्या सुमारास हा गड सिद्दी खैरतखानाने जिंकला, परंतु १७४५ मध्ये तो पुन्हा तुळाजी आंग्रे यांनी जिंकून त्याचा ताबा मिळविला. १८१८ च्या सुमारास इंग्रजांनी मराठ्यांकडून हा किल्ला जिंकला, असे इतिहासाचे काही जाणकार सांगतात. सुमारे सात एकर क्षेत्रावर पसरलेल्या या गडावर भक्कम तटबंदी, १५ बुरूज आणि तोफा ठेवण्यासाठी जांभा दगडाचे चौथरे आहेत, असेही सांगितले जाते. राज्य सरकारने यास संरक्षित वास्तू म्हणून घोषित केले आहे, असेही सांगण्यात येते. तरीही, काही स्थानिक कुटुंबांनी १९६० च्या दशकात किल्ल्यची जागा विकत घेतल्याचा दावा केला असून प्रशासकीय दुर्लक्ष, उपेक्षा किंवा अन्य कोणत्याही कारणाने, गडाची कागदोपत्री मालकी या कुटुंबाकडे गेली, असा आक्षेप घेतला जातो. आता तो खाजगी वहिवाटीतून मुक्त करावा आणि सरकारने त्याची देखभाल, डागडुजी, मालकी हाती घ्यावी अशी मागणी केली जात आहे. या गडाच्या मालकीचा वाद थेट न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. आता शासनाने किल्ला ताब्यात घेण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनास दिल्या आहेत. प्रशासकीय बेफिकीरीमुळे साडेसहा दशकांपूर्वी कधीतरी एका कुटुंबांच्या खाजगी मालकीमुळे इतिहास हरवलेल्या या गडाच्या मुक्तीचा सोहळा सुरू झाला आहे. त्यासाठी कदाचित कायदेशीररीत्या बूसंपादन करावे लागेल. मालकीचा दावा करणाऱ्यांना मोबदला द्यावा लागेल. आता त्याबाबतच्या कागदपत्रांची तपासणीही सुरू झाली आहे. हा ऐतिहासिक किल्ला म्हणजे शिवकालीन वैभवाचा पुरावा असल्याची बाब येथे मालकीचा दावा करणाऱ्यांनी नाकारलेली नाही. आंबे उचलल्यामुळे झालेल्या वादावादीबद्दल या कुटुंबाने दिलगिरीही व्यक्त केल्याचे सांगण्यात येते. थोडक्यात, हा किल्ल्याच्या राज्य संरक्षित वास्तू दर्जास मान्यता मिळत आहे. याआधीही या किल्ल्याच्या मालकीवरून वाद उफाळले होते, पण न्यायालयीन निकालानंतर त्याचा राज्य संरक्षित स्मारकांचे दर्जा कायम राहिल्याने तो सर्वसामान्य नागरिक, पर्यटकांसाठी खुला असतानाही तेथे प्रवेशबंदही होती. त्या दोन आंब्यांनी झाडावरून पडून या गडाच्या या व्यथेकडे लक्ष वेधले, आणि त्यामुळे झालेल्या वादावादीतून उद्धाराच्या प्रतीक्षेचा प्रवास सुरू झाला. हा वाद कायमचा निकाली काढून एका उपेक्षित इतिहासाचा उद्धार करण्याचे पुण्य पदरी पाडून घेण्याची संधी राज्य सरकारला प्राप्त झाली आहे. १९६० मध्ये सत्तेवर असलेल्या तत्कालीन सरकारच्या अखत्यारीतील प्रशासकीय यंत्रणांनी लिलाव केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या वर्तमान अवस्थेविषयी अनेक बाबी उजेडात येऊ लागल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर ज्या कुटुंबांनी पाकिस्तानात स्थलांतर करण्याचा पर्याय निवडला, त्या कुटुंबांच्या भारतातील मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रशासकीय बाब असल्याने अशाच काही प्रकारातून त्याचा लिलाव केला गेला असावा, अशी चर्चा आहे. मात्र, ऐतिहासिक वारसा असलेल्या जागेची मालकी अशा खाजगी कुटुंबाकडे कशी गेली, त्या जागेची दुरवस्था का झाली, त्याबाबत कळत नकळत, प्रशासकीय त्रुटीतून किंवा कदाचित कोणत्याही हितसंबंधातून मालकीचे हक्क अन्य कुटुंबास बहाल करण्याचे कागदोपत्री व्यवहार कसे झाले, असे गोपाळगडाच्या प्रकरणातून उभे राहिलेले अनेक प्रश्न भविष्याती प्रशासकीय चुका टाळण्याचा धडा ठरणार आहेत. या ठिकाणी असलेल्या अनेक ऐतिहासिक पुराव्यांची दुर्दशा झाली आहे. इतिहासकालीन विहीरी, खंदक बुजविले गेले आहेत, नवे रस्ते तयार केल्याने इतिहासाचे पुरावेही गाडले गेले आहेत असा दुर्गप्रेमींचा आक्षेप आहे. ही जागा आता खाजगी मालकीवरून मुक्त करावी आणि तिचा इतिहास पुन्हा अभिमानाने उजळेल अशी कारवाई सरकारने करावी अशीही दुर्गप्रेमींची मागणी आहे. एका उपेक्षेच्या उद्धारासाठी घडलेले निमित्त आता अंतिम टप्प्यावर पोहोचले आहे. आता केवळ सरकारच्या धाडसी निर्णयाची प्रतीक्षा आहे. लवकरच ती पूर्ण होईल, आणि उपेक्षित गोपाळगड मुक्ततेचा श्वास घेईल, अशा विश्वासाचे वातावरण गडावर पसरू लागले आहे.