सांगली
Gopichand Padalkar सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मिरवणूक आणि विशेष सभेच्या कार्यक्रमात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावत शायरीच्या माध्यमातून राजकीय फटकेबाजी केली. आमदार जयंत पाटील यांचे नाव थेट न घेता त्यांनी केलेल्या वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते. मिरवणुकीनंतर झालेल्या सभेत पडळकर यांनी शायरीतून आपले विचार मांडताना “मैने बोला था, एंट्री लेट होगी, पर ग्रेट होगी… जिंदगी जीते है हम शान से… तभी तो दुश्मन जलते है हमारे नाम से…” असे म्हणत अप्रत्यक्षपणे विरोधकांवर निशाणा साधला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित समर्थकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. धनगर समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी व्यापक पातळीवर लढा देण्याची गरज असून, “एक लाख टक्के आरक्षण मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व ताकद लावावी लागेल,” असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.पडळकर यांनी यावेळी ईश्वरपूरमध्ये अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक नसल्याबाबतही भाष्य केले. स्थानिक Gopichand Padalkar पातळीवर लोकसहभागातून अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा आणि स्मारक उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. समाजाच्या पुढाकारातून हे काम पूर्ण केले जाईल, असेही ते म्हणाले.या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ईश्वरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर पहिल्यांदाच पडळकर ईश्वरपूरमध्ये दाखल झाल्याने या भेटीकडे विशेष लक्ष वेधले गेले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेमुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात या घडामोडींचे राजकीय परिणाम दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.