Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे ही विभागांसह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. देवळी मतदारसंघातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून, शेवटच्या नागरिकाचे निवेदन स्विकारल्याशिवाय येथून हलणार नाही. देवळी मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला न्याय देणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आ. राजेश बकाने, माजी खा. रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नपचे उपाध्यक्ष राहुल चोपडा, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, सुनील गफाट, मिलींद भेंडे आदी उपस्थित होते.
इतकी वर्षे काम करूनही मोठ्या संख्येने लोक समस्या घेऊन प्रशासनासमोर येत असतील, तर ही आत्मपरीक्षणाची वेळ आहे. आज येणारी सर्व निवेदने एक महिन्याच्या आत निकाली काढण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. राज्य सरकारच्या सर्व योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकप्रतिनिधी कटिबद्ध असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. आमदार बकाने यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन घेतलेल्या परिश्रमामुळे आज सुमारे दोन हजार नागरिकांना त्यांच्या हकाच्या घरांचे पट्टे मिळाले आहेत. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच पट्टे मिळवून दिले जातील, असे पालकमंत्री म्हणाले.
ग्रामीण भागातील नागरिकांची रस्ते आणि पांदणची सातत्याने मागणी असते. त्यामुळे देवळी मतदारसंघातील अधिकाधिक पांदण मंजूर करण्यासह रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्यांचे डांबरीकरण करून द्यावे, अशी मागणी आ. बकाने यांनी केली. तसेच अतिक्रमण नियमानुकूल करण्यातील तांत्रिक अडचणींवरही त्यांनी प्रकाश टाकला. यावेळी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांनीही मनोगत व्यत केले. जनसंवाद कार्यक्रमात २४ शासकीय विभागाचे कार्यालय प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तालुयातील नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित आपली निवेदने आणि तक्रारी पालकमंत्र्यांकडे थेट सुपूर्द केल्या.