ठाणे
illegal hydrocarbon oil ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील उसाटणे परिसरात अवैधरित्या साठवून ठेवलेल्या ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’च्या मोठ्या साठ्यावर राज्य दक्षता पथकाने रविवारी धडक कारवाई करत सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे इंधन काळाबाजाराच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून संबंधितांविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांच्या मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार राज्य दक्षता पथकाने न्यूओ लॉजिस्टिक पार्क परिसरातील राज्यस्तरीय प्लॉट क्रमांक २० समोर छापा टाकला. या कारवाईदरम्यान टँकरचे सील तोडून मोठ्या प्रमाणात मिक्स हायड्रोकार्बन ऑईलची बेकायदेशीर साठवणूक आणि हस्तांतरण सुरू असल्याचे उघड झाले. घटनास्थळी दोन व्यक्ती प्रत्यक्षरीत्या या व्यवहारात सहभागी असल्याचेही निदर्शनास आले.
तपासादरम्यान GJ-12 BY-7560 क्रमांकाचा टँकर पूर्णपणे भरलेल्या अवस्थेत आढळला, ज्यामध्ये सुमारे २९ हजार ७०० किलो इंधन असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच MH-43 E-190 क्रमांकाच्या आणखी एका टँकरमधून इलेक्ट्रिक मोटारीच्या सहाय्याने इंधन साठवणूक सुरू असल्याचे आढळले. याशिवाय MH-46 C-1282 क्रमांकाच्या टेम्पोमध्ये २०० लिटर क्षमतेच्या बॅरलमध्ये तेलाची साठवणूक सुरू होती, तसेच अनेक रिकामे बॅरल्स आणि इतर उपकरणेही जप्त करण्यात आली.
या कारवाईत एकूण सुमारे illegal hydrocarbon oil१ कोटी २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये टँकर्स, टेम्पो, बॅरल्स, इलेक्ट्रिक मोटार आणि एअर ऑपरेटेड डायाफ्राम पंप यांचा समावेश आहे. संबंधितांकडे इंधन साठवणुकीचे कोणतेही वैध परवाने किंवा कागदपत्रे नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अवैध इंधन साठवणूक, वाहतूक आणि काळाबाजाराशी संबंधित संपूर्ण साखळीचा शोध घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवहारांमुळे महसुलाचे मोठे नुकसान तसेच सुरक्षेचा गंभीर धोका निर्माण होत असल्याने पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.