विश्वचषकाच्या रणांगणात आज भारत-पाकिस्तान आमनेसामने!

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
लंडन,
india and pakistan face off today आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेची सुरुवात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुचर्चित सामन्याने होणार असून या हाय-व्होल्टेज लढतीकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विजयी सुरुवात करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे, तर पाकिस्तान संघही उलटफेर घडवून आणण्याच्या तयारीत आहे.
 
india and pakistan face off today
 
गेल्या काही वर्षांत भारतीय महिला संघाने सातत्यपूर्ण कामगिरी करत जागतिक क्रिकेटमध्ये आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर आता संघाचे लक्ष्य टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी उंचावण्याचे आहे. मात्र स्पर्धेपूर्वीच्या काही मालिकांमध्ये भारताला अपेक्षित यश मिळाले नाही. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध झालेल्या पराभवांमुळे संघावर काहीसा दबाव असला तरी भारतीय संघ अजूनही स्पर्धेतील प्रमुख दावेदारांपैकी एक मानला जात आहे.
 
भारतीय संघाच्या फलंदाजीची धुरा स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्या खांद्यावर असेल. अलीकडील सामन्यांमध्ये सलामीची जोडी मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरली असली, तरी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांच्याकडून आक्रमक सुरुवातीची अपेक्षा आहे. मधल्या फळीत हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांच्यावर मोठी जबाबदारी असेल.
 
दुसरीकडे, पाकिस्तान महिला संघाला मागील काही टी-२० विश्वचषकांमध्ये फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. २०१६ नंतर एकाही स्पर्धेत पाकिस्तानला एकापेक्षा अधिक सामने जिंकता आलेले नाहीत. त्यातच कर्णधार फातिमा सना हिच्या फिटनेसबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सरावादरम्यान दुखापत झाल्यानंतरही ती भारताविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचा इतिहास पाहिला तर भारतीय संघाचे स्पष्ट वर्चस्व दिसून येते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १६ सामने खेळले गेले असून भारताने १३ वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानला केवळ तीन सामन्यांत यश मिळाले आहे. आकडेवारी भारताच्या बाजूने असली तरी भारत-पाकिस्तान सामना हा नेहमीच दबाव, उत्सुकता आणि अनिश्चिततेने भरलेला असतो. त्यामुळे विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ विजयाने मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतील आणि क्रिकेटप्रेमींना एका रोमांचक लढतीची मेजवानी मिळण्याची शक्यता आहे.