पुणे,
Indrayani River पुणे जिल्ह्यातील देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच इंद्रायणी नदीतील गंभीर प्रदूषणाची धक्कादायक बाब समोर आली आहे. येत्या ७ जुलै २०२६ रोजी पालखी सोहळ्याचे देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी देहूत दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. मात्र त्यापूर्वीच नदीपात्रात हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसत असून काही माशांच्या शरीरावर किडे पडल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका उपस्थित होत असून संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरल्याने स्थानिक नागरिक आणि भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अधिक मासाच्या निमित्ताने सध्या देहू परिसरात भाविकांची गर्दी वाढलेली असताना ही घटना घडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.दरवर्षी नदी स्वच्छतेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असूनही अशी अवस्था निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वारकऱ्यांनीही प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्न उपस्थित करत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत नदीपात्रातील मृत मासे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू केले आहे.
पालखी सोहळ्याच्या Indrayani River पार्श्वभूमीवर लाखो भाविक देहू येथे येणार असल्याने सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न अधिकच संवेदनशील बनला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीतील प्रदूषणास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी तसेच नदी स्वच्छता आणि पुनरुज्जीवनासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी विविध सामाजिक संघटना आणि वारकरी संप्रदायाकडून जोर धरू लागली आहे.