तेहरान ते मशहद... खामेनींच्या अंतिम यात्रेचा मार्ग निश्चित

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
तेहरान,
khameneis funeral इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधी आणि अंत्ययात्रेच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. इराणी राज्य माध्यमांच्या माहितीनुसार, ४ जुलैपासून सुरू होणारा हा शोकसोहळा ९ जुलैपर्यंत विविध शहरांमध्ये पार पडणार असून त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर पवित्र मशहद शहरातील इमाम रझा दर्ग्यात दफनविधी केला जाणार आहे.
 
khameneis funeral
 
मिळालेल्या माहितीनुसार, ४ आणि ५ जुलै रोजी तेहरानमधील इमाम खोमेनी मुसल्ला येथे जनतेला खामेनी यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. त्यानंतर ६ जुलै रोजी राजधानी तेहरानमध्ये भव्य अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. ७ जुलैला धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या कोम शहरात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अखेरीस ९ जुलै रोजी मशहद येथे अंतिम विधी पार पडतील.
 
अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झाल्याचे इराणने यापूर्वी जाहीर केले होते. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात ते ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांच्या निधनानंतर देशातील नेतृत्वबदलाची प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांचे पुत्र मोजतबा खामेनी यांनी सर्वोच्च नेतृत्वाची सूत्रे स्वीकारल्याचे वृत्त आहे.
 
दरम्यान, इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शांतता चर्चांना वेग आला आहे. युद्धाच्या वर्षपूर्तीनिमित्त इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी संघर्षात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करताना देश अंतिम विजयापर्यंत लढत राहील, असा निर्धार व्यक्त केला. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलवर नागरिक तसेच निरपराध मुलांना लक्ष्य केल्याचा गंभीर आरोपही केला आहे.