२४ तासांत सहा जणांचा 'दुर्दैवी मृत्यू'

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra road accidents राज्यात गेल्या २४ तासांत लातूर, पुणे, भंडारा आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये भीषण रस्ते अपघातांची मालिका घडली असून, यात एकूण सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गांवरील अतिवेग, चुकीचे ओव्हरटेकिंग, नियमभंग आणि रस्त्यावरील स्थितीचा अंदाज न आल्यामुळे हे अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काही घटनांमध्ये संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, भंडाऱ्यातील ‘हिट अँड रन’ प्रकाराने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Maharashtra road accidents, fatal road accidents in Maharashtra, Latur accident 
लातूर जिल्ह्यातील चाकूरजवळ लातूर–नांदेड महामार्गावर अलगरवाडी क्रॉसिंग पॉईंट येथे ट्रक, कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. जनार्धन येणगे (६०), सविता येणगे (५५) आणि श्रेयस वाघमारे (१६) अशी मृतांची नावे आहेत. येणगे दांपत्य मोटारसायकलने तेलगावकडे जात असताना भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला आणि एका कारला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चाकूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात रांजणगाव एमआयडीसी आणि राजगड परिसरात दोन वेगवेगळे अपघात घडले. रांजणगाव औद्योगिक क्षेत्रात टेम्पो आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शिरूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे, राजगड परिसरातील आंबवणे–बोरावळे मार्गावर चारचाकी वाहनाने अचानक दिशाबदल केल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
भंडारा जिल्ह्यात साकोली–भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव परिसरात झालेल्या ‘हिट अँड रन’ घटनेत दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कुंडलिक वालदे (६३) आणि भिवा बोंदले (७०) हे दोघे रस्त्याच्या कडेला फिरत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड परिसरात मुंबई–आग्रा महामार्गावर दोन वेगवेगळे अपघात घडले. मंगरूळ येथे भरधाव कारने मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने सुलतान शेख यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत मेडिकल कॉलेजसमोरील परिसरात स्पीड ब्रेकरचा अंदाज न आल्याने मोटारसायकल घसरून वंदना संजय डोंगरे या महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांचा तपास चांदवड पोलीस करत आहेत.दरम्यान, या सलग अपघातांनंतर पोलीस प्रशासनाने नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आणि महामार्गांवर वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.