मुंबई
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांसंदर्भात नागपूर जिल्ह्यात मोठी घडामोड समोर आली आहे. ई-केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण न केलेल्या अनेक लाभार्थ्यांमुळे मोठ्या संख्येने महिलांना योजनेतून अपात्र ठरवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या सूत्रांनुसार, जिल्ह्यात एक लाखाहून अधिक महिलांचा यामध्ये समावेश असू शकतो, मात्र याबाबतची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची अचूक पडताळणी करण्यासाठी राज्यभरात मागील सुमारे आठ ते दहा महिन्यांपासून ई-केवायसी मोहीम राबवण्यात आली होती. बँक खाते आणि आधार क्रमांक लिंक करून पात्रतेची खात्री करण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले होते. तरीही नागपूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिलांनी निर्धारित मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही मुदतवाढ आता पुन्हा दिली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.
दरम्यान, पडताळणी प्रक्रियेत अनेक अनियमितता उघड झाल्याचेही समोर आले आहे. काही लाभार्थ्यांनी उत्पन्नाबाबत खोटी माहिती सादर करून योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकरणांची तपासणी करताना आयकर विभाग आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) डेटाबेसचा वापर करण्यात आला. ज्या कुटुंबांकडे आयकर भरण्याची नोंद आहे किंवा ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन नोंदणीकृत आहे, अशा प्रकरणांचीही सखोल छाननी करण्यात आली असून नियमबाह्य लाभार्थ्यांना योजनेतून Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana वगळण्यात आले आहे.दुसरीकडे, खऱ्या अर्थाने पात्र असूनही विविध तांत्रिक अडचणींमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी प्रशासनाने पुन्हा एकदा फेरतपासणीची तयारी सुरू केली आहे. अशा प्रकरणांची स्वतंत्र पडताळणी करून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील हप्त्यांचा लाभ देण्याचा विचार करण्यात येत असल्याचे संकेत अधिकाऱ्यांकडून मिळाले आहेत.
मात्र, ई-केवायसी प्रक्रिया न पूर्ण करणाऱ्या किंवा चुकीची माहिती सादर करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आता योजनेचे दरवाजे कायमचे बंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या निर्णयाचा नागपूर जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिलांवर थेट परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.