सात जणांनी केला युवकाचा निर्घृण खून

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
- हत्याकांडाची मालिका थांबेना - कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

अनिल कांबळे
नागपूर, 
Murder case नाश्त्याच्या दुकानात अंगावर पाणी पडल्यावरुन दोन युवकांमध्ये झालेला वाद एका महिलेच्या घरासमोर पोहचला. तेथे अश्लील शिवीगाळ करणाऱ्या दोघांनाही एका महिलेने हटकले. मात्र, त्या महिलेला शिवीगाळ केल्यामुळे तिच्या कुटुंबीयातील तब्बल सात आरोपींनी एका युवकाचा निर्घृण खून केला. ही धक्कादायक घटना भरतवाडा रोडवरील एका नाश्ता दुकानासमोर घडली. योगेश बीरसिंग शाहू (वय २८, रा. भगत नगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम राजेश पिलारे(वय २०), राजेश दुधराम पिलारे(वय ५२), सरिता राजेश पिलारे(वय ४७), शिवाणी राजेश पिलारे(२४) सर्व रा प्लॉट नं १०, भरतवाडा गॅस गोडाऊनजवळ, साई कृपा सोसायटी, प्रफुल सुरेश बांते (वय १८), शुभांगी सुरेश बांते(वय ४५) रा. साई कृपा सोसायटी, आणि मंगेश रहांगडाले (२०, गुलमोहर नगर) अशी आरोपींची नावे आहेत.

Murder 
 (संग्रहित छायाचित्र)
 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजा शाहू, रोहित आणि योगेश शाहू हे तिघेही कामगार असून रविवारी सकाळी ९ वाजता कामावर गेले होते. १०.३० मिनीटांनी काम आटोपून ते भरतगनर रोडवरील अंकित नाश्ता सेंटरवर थांबले. नाश्ता करीत असताना योगेश शाहूकडून मंगेश रहांगडाले याच्या अंगावर पाणी सांडले. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. हॉटेलमालकाने त्यांना दुकानाबाहेर काढले. ते सर्व वाद घालत शिवाणी पिलारे हिच्याघरासमोर पोहचले. शिवाणीने त्यांना घरासमोरुन निघून जाण्यास सांगितले. त्यामुळे योगेशने शिवाणीला शिविगाळ केली. त्यामुळे शिवाणीची आई सरिता पिलारे ही घरातून बाहेर आली. तिने योगेशच्या कानशिलात लगावली. त्यानंतर अन्य आरोपी राजेश पिलारे, प्रफुल बांते आणि शुभांगी बांते हे सर्व जण बाहेर आली. त्यांनी योगेशसह तिघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यात मुख्य आरोपी शुभम पिलारे तेथे आला. त्याने घरातून चाकू आणला आणि योगेशवर हल्ला केला. योगेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर राजा आणि रोहित यांनी योगेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी योगेशला मृत घोषित केले. या प्रकरणी कळमना पोलिसांनी सात आरोपींवर हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.