सिमेंट रस्ते बनले भूजलाचे ‘रिचार्ज स्टेशन’

नागपूर मनपाचा राज्यातील पहिलाच प्रयोग

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur rainwater harvesting project सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी थेट नाल्यांमध्ये वाहून जाऊन वाया जाते आणि भूजल पातळी घटते. या समस्येवर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेने एक अभिनव पाऊल उचलले आहे. शहरातील सर्व सिमेंट रस्ते टप्प्याटप्प्याने ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ प्रणालीशी जोडण्याचा निर्णय मनपाने घेतला असून, चौथ्या टप्प्यातील सिमेंट रस्ते प्रकल्पात त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
 
 

Nagpur rainwater harvesting project

१०० ठिकाणी रिचार्ज पिट्स
२६० कोटी रुपये खर्चाच्या चौथ्या टप्प्यातील सिमेंट रस्ते प्रकल्पांतर्गत आतापर्यंत शहरातील १०० ठिकाणी ‘रिचार्ज पिट्स’ अर्थात शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत. जॉगर्स पार्क, सुयोगनगर, वंजारीनगर, प्रतापनगर, डॉक्टर्स कॉलनी, धंतोली आणि दही बाजार परिसरातील रस्त्यांवर ही सुविधा उभारण्यात आली आहे.
 
 
अशी होणार भूजलाची भर
रस्त्यांच्या कडेला सुमारे २० मीटर खोल खड्डे खोदण्यात आले आहेत. हे खड्डे पावसाळी नाल्यांच्या चेंबर्सशी जोडण्यात आले असून रस्त्यावरून वाहणारे पाणी त्यामध्ये जमा होईल. त्यानंतर हे पाणी जमिनीत मुरून भूजल पुनर्भरणास मदत करणार आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढण्यास हातभार लागणार आहे.खोलगट भागातील घरांसमोर स्वतंत्र चेंबर्स तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे मुसळधार पावसात घरांसमोर पाणी साचणे किंवा घरात पाणी शिरण्याच्या समस्येतही मोठ्या प्रमाणात घट होण्याची अपेक्षा आहे.चौथ्या टप्प्यात ३३ किलोमीटर लांबीचे सिमेंट रस्ते १४ पॅकेजमध्ये विकसित केले जात आहेत. यापैकी सुमारे ६.९ किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या तीन टप्प्यांतील सिमेंट रस्त्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा नव्हती.
 
 
राज्यातील पहिला उपक्रम
या शोषखड्ड्यांमध्ये कचरा जाऊ नये यासाठी संरक्षक जाळी बसविण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण यंत्रणेची देखभाल पुढील दहा वर्षे कंत्राटदार कंपनीकडून केली जाणार आहे.मनपाचे मुख्य अभियंता मनोज तलवार यांनी सांगितले की, राज्यात सिमेंट रस्त्यांसोबत रेन वॉटर हार्वेस्टिंगची जोड देण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. हा उपक्रम यशस्वी ठरल्यास भविष्यात शहरातील सर्व सिमेंट रस्त्यांवर अशी व्यवस्था उभारली जाईल. पर्यावरणपूरक आणि शाश्वत नागपूरच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.