हॉलतिकिटावरच विषय बदलला!

विद्यापीठाच्या नव्या गोंधळाने विद्यार्थी धास्तावले

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी-२०२६ परीक्षांमध्ये पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थापनातील त्रुटी समोर आली आहे. बी.ए. द्वितीय सत्र (एनईपी) परीक्षेच्या काही विद्यार्थ्यांच्या हॉलतिकिटांवर चुकीच्या विषयाची नोंद झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Nagpur University hall ticket error, 
विद्यापीठाने शनिवारी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांवर ‘ओपन इलेक्टिव्ह २’ हा विषय नमूद करण्यात आला आहे. मात्र, संबंधित सत्रासाठी प्रत्यक्षात ‘ओपन इलेक्टिव्ह १’ हा विषयच निर्धारित आहे. ही चूक तांत्रिक त्रुटीमुळे झाल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले असून विद्यार्थ्यांना ‘ओपन इलेक्टिव्ह १’ या विषयानुसारच १५ जून रोजी परीक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.परीक्षेच्या तोंडावर झालेल्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. विषयासारख्या महत्त्वाच्या बाबतीत हॉलतिकिटावर चूक होणे गंभीर असून अशा प्रकारांकडे केवळ ‘तांत्रिक त्रुटी’ म्हणून पाहता येणार नाही, असे शिक्षक व विद्यार्थ्यांचे मत आहे.विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी बी.कॉम. चौथ्या सत्राच्या ‘फंडामेंटल्स ऑफ इन्शुरन्स’ विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बँकिंगशी संबंधित प्रश्न आल्याने विद्यापीठाला तो पेपर रद्द करावा लागला होता. त्यातच आता हॉलतिकिटावरील विषयातील गोंधळ समोर आल्याने परीक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.