नंददीप फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश
कुटुंबियांच्या डोळ्यांत आनंदाश्रू
यवतमाळ,
Nanddeep Foundation कधीकधी एखाद्या आईच्या डोळ्यांतील अश्रू, बहिणीच्या मनातील प्रतीक्षा आणि कुटुंबाच्या हृदयातील वेदना वर्षानुवर्षे शब्दांत मांडता येत नाहीत. मात्र आज असा एक क्षण घडला, ज्याने हरवलेल्या आशेचा दिवा पुन्हा प्रज्वलित झाला. जवळपास एक वर्षापासून मानसिक संतुलन हरवल्यामुळे घरापासून दूर भटकत असलेला प्रकाश बाबुराव धनदर अखेर आपल्या कुटुंबियांपर्यंत सुखरूप पोहोचला.
नंदिनी शिंदे आणि संदीप शिंदे यांनी उभारलेल्या नंददीप फाऊंडेशन संचालित बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा भावनिक पुनर्मिलाप शक्य झाला. प्रकाश याला काही महिन्यांपूर्वी अत्यंत असहाय आणि भटक्या अवस्थेत घोडे या शिक्षकाला तो दिसला आणि त्यांनी त्याला संस्थेच्या निवारा केंद्रात आणले. त्यावेळी त्याची मानसिक अवस्था गंभीर होती. त्याच्याकडे ना स्वतःची ओळख होती, ना घराचा पत्ता आणि ना कोणताही आधार.
संस्थेने त्याला आश्रय, अन्न, वस्त्र आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले. मानसोपचार तज्ञ डॉ. श्रीकांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात त्याच्यावर नियमित उपचार सुरू करण्यात आले. प्रकाश हळूहळू सावरू लागला. त्याच्या आठवणी जागृत होऊ लागल्या आणि त्याच्या आयुष्याची हरवलेली पानं पुन्हा उलगडू लागली. यानंतर नंददीप फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक दिवसांनंतर त्याची बहीण आणि कुटुंबियांचा पत्ता शोधण्यात यश आले. नागपूरच्या तिरपुडे सोशल वर्क कॉलेजचे विद्यार्थी चेतन ठाकरे यांनी या पुनर्वसन मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावत गुरुवार, 11 जून रोजी प्रकाशला अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील शिवनगाव (फ) येथे त्याच्या बहिणीच्या स्वाधीन केले.
भावाला पाहताच बहिणीच्या डोळ्यांतून अशूंचा बांध फुटला. कुटुंबीयांनी सांगितले की, आमचा भाऊ एक वर्षापासून बेपत्ता होता. तो जिवंत असेल की नाही, याचीही आम्हाला खात्री उरली नव्हती. आज तो पुन्हा आमच्यासमोर उभा आहे, हा आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. हरवलेल्या माणसाला पुन्हा त्याचे घर, त्याची माणसं आणि जगण्याची नवी उमेद मिळवून देणे, ही एक मोठीच सेवा आहे. प्रकाशच्या चेहèयावर उमटलेले समाधान आणि कुटुंबियांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू हेच नंददीप फाऊंडेशनच्या कार्याचे खरे यश आहे.