नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील खोली गेट परिसरातील दृष्य
गोंदिया,
navegaon-nagzira tiger reserve मृग नक्षत्र लागले असतानाच विदर्भात मान्सूनच्या सरींनी हजेरी लावली असली तरी उष्णतेचा कडाका अद्याप कायम आहे. त्यातच सद्यास्थितीत जिल्ह्यातील तापमान 40 अंशांच्या आसपास असल्याने जंगलातील वन्यजीवांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अशातच जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरातील एका पाणवठ्यावर तहानलेल्या वाघाने तृष्णातृप्ती केल्याचे पर्यटकांना दिसून आले. तहान भागवत असलेल्या या वाघाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवेगावबांध वनपरिक्षेत्रातील ‘खोली गेट’जवळील पाणवठ्यावर रविवारी 14 जून रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास हा वाघ पाणी पिताना दिसून आला. उन्हामुळे हैराण झालेला वाघ काही काळ पाणवठ्याजवळ थांबून शांतपणे पाणी पीत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. पाणवठ्यावर निवांतपणे तहान भागवल्यानंतर वाघ पुन्हा जंगलाच्या दिशेने निघून गेला. वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवासातील हे मनमोहक आणि दुर्मीळ दृश्य कॅमेर्यात कैद झाले असून, वन्यजीवप्रेमींकडून या व्हिडिओला मोठी पसंती मिळत आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची वाघाचा कॅरीडोर म्हणून ओळख असून अजघडीला प्रकल्पातंर्गत जंगलात 20 पेक्षा अधिक वाघ असल्याची माहिती आहे. दरम्यान, जिल्ह्यात वाघाच्या घडत असलेल्या घटनांवरून सभोवताल वाघाचे अधिवास दिसून येत आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी चोरखमारा गेट परिसरात वाघिणीचे ‘मॉर्निंग वॉक’चे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज, रविवारी ‘खोली गेट’ परिसरात वाघोबाची तृष्णा तृप्ती कॅमेर्यात कॅद झाली असून प्रकल्पातील समृद्ध वन्यजीव संपदेची पुन्हा एकदा प्रचिती यातून येत आहे.