'नीट' पुनर्परीक्षेच्या नियमांत सुधारणा

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
- विद्यार्थ्यांना मिळणार १५ मिनिटे अतिरिक्त

नागपूर, 
NEET Re-examination Rules राष्ट्रीय परीक्षा संस्थेने वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेच्या पुनर्परीक्षेसाठी तीन महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. परीक्षा अधिक विद्यार्थी-केंद्रित, पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने हे निर्णय घेण्यात आले आहेत.
 
 
neet

- परीक्षेसाठी मिळणार १५ मिनिटे अतिरिक्त
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विद्यार्थ्यांना आता प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अतिरिक्त १५ मिनिटांचा वेळ मिळणार आहे. यामुळे परीक्षेचा कालावधी तीन तासांवरून तीन तास १५ मिनिटे करण्यात आला आहे. उपस्थिती पडताळणी आणि इतर अनिवार्य प्रक्रिया पूर्ण करताना विद्यार्थ्यांच्या लेखन वेळेवर परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुनर्परीक्षा दुपारी २ वाजता सुरू होऊन सायंकाळी ५.१५ वाजता संपणार आहे. सुधारित वेळापत्रकामुळे परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थापन अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. प्रश्नपुस्तिकेतील कच्च्या कामासाठी उपलब्ध पानांची संख्या दोनवरून चार करण्यात आली आहे. प्रश्नपुस्तिकेच्या सुरुवातीला दोन आणि शेवटी दोन पाने उपलब्ध असतील. विशेषतः डाव्या हाताने लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे.
- सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही सुधारित व्यवस्था भविष्यातील सर्व प्रश्नपत्रिकांनाही लागू राहणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि परीक्षेशी संबंधित सर्व माहिती व अद्यतनांसाठी केवळ राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.