- कुलगुरूंच्या अध्यक्षतेखालील बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन
नागपूर,
padmashri puraskar vijeta विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देऊन देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या विदर्भातील मान्यवरांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे. हा विशेष सोहळा रविवार, २८ जून रोजी सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या नागरी सत्कार सोहळ्यात पद्मश्री शंकर बाबा पापळकर, पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, पद्मश्री डॉ. विलास डांगरे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, पद्मश्री सत्यनारायण नुवाल आणि पद्मश्री जनार्दनपंत बोथे यांचा गौरव करण्यात येणार आहे. समाजसेवा, आरोग्य, शिक्षण आणि विविध क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा यावेळी विशेष सन्मान केला जाणार आहे.
कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सत्कार कार्यक्रमाची रूपरेषा, आयोजन आणि विविध बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी ८ मार्च २०२५ रोजी झालेल्या अधिसभेच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. या सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती गठित करण्यात आली होती.
बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांच्यासह समिती सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्वांच्या संयुक्त चर्चेनंतर नागरी सत्कार कार्यक्रमाचे नियोजन निश्चित करण्यात आले.
विदर्भातील पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा विद्यापीठाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याचे मानले जात आहे.