परीक्षा हुकण्याच्या भीतीने 'पाटलीपुत्र' पेटलं!

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
पाटणा,
patliputra railway station बिहारमधील पाटलीपुत्र रेल्वे स्थानक शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत अक्षरशः रणांगण बनले. भरती परीक्षेसाठी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक इतका तीव्र होता की रेल्वे वाहतूक तब्बल सहा तास विस्कळीत झाली. अनेक गाड्या रोखण्यात आल्या, रेल्वेच्या मालमत्तेची तोडफोड करण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना अश्रुधुराचा मारा तसेच हवेत गोळीबार करावा लागला. मात्र, आंदोलक विद्यार्थ्यांवर त्याचाही अपेक्षित परिणाम झाला नाही.
 
patliputra railway station
 
राज्यात प्रोहिबिशन कॉन्स्टेबल, वॉर्ड इन्स्पेक्टर आणि मोबाईल स्क्वॉड कॉन्स्टेबलच्या हजारो पदांसाठी लेखी परीक्षा सुरू असून विविध जिल्ह्यांतील उमेदवार रेल्वेने परीक्षा केंद्रांकडे रवाना होत होते. मात्र, प्रचंड गर्दीमुळे अनेक विद्यार्थ्यांना गाड्यांमध्ये चढताच आले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रेल्वे रुळांवर उतरून गाड्या रोखण्यास सुरुवात केली. रात्री साडेअकराच्या सुमारास सीमांचल एक्स्प्रेस पाटलीपुत्र स्थानकावर दाखल झाली. आधीपासूनच खचाखच भरलेल्या या गाडीत अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. परीक्षा हुकणार असल्याची भीती निर्माण झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी गाडी पुढे जाऊ न देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली आणि रुळांवर उतरलेल्या जमावाने इतर गाड्यांनाही लक्ष्य केले.
 
मध्यरात्रीनंतर आलेली मधुबनी विशेष गाडीही आंदोलकांच्या रोषापासून वाचू शकली नाही. परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या उमेदवारांना घेऊन जाणाऱ्या या गाडीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन करत तीही रोखून धरली. इतकेच नव्हे तर स्थानकाबाहेरून येणारी मालगाडीही थांबवण्यात आली. परिणामी संपूर्ण रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. विद्यार्थ्यांचा रोष कमी करण्यासाठी प्रशासनाने विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था केली. अधिकाऱ्यांनी वारंवार घोषणा करून परीक्षा वेळेत गाठता येईल, असे आश्वासन दिले. मात्र आंदोलक कोणतेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. विशेष गाडी स्थानकावर आल्यानंतरही तिची तोडफोड करण्यात आली आणि गाडी बराच उशिराने रवाना झाली.
 
दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, हवेत गोळीबारही करण्यात आला; परंतु संतप्त विद्यार्थ्यांनी माघार घेण्यास नकार दिला. अखेर पहाटेच्या सुमारास परिस्थिती हळूहळू नियंत्रणात आली आणि रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. पाटणा जिल्हा प्रशासनाने या घटनेमागे काही समाजकंटक असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनाही काही जण अडवत होते. विशेष गाड्यांची व्यवस्था करूनही आंदोलकांनी सहकार्य न केल्याने परिस्थिती बिघडली. आता परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली असून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.