पटणा
Bihar exam special train delay परीक्षेला जाण्यासाठी नियोजित विशेष ट्रेन उशिरा आल्याने बिहारमधील पाटलिपुत्र रेल्वे स्थानकावर रविवारी मोठा गोंधळ उडाला. बिहार पोलिस अवर सेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मोठ्या संख्येने जमलेल्या उमेदवारांचा संयम तुटल्याने परिस्थिती चिघळली आणि आंदोलनाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षार्थींना परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष ट्रेनची व्यवस्था केली होती. मात्र या ट्रेनच्या विलंबामुळे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. सुरुवातीला उमेदवारांनी शांतपणे नाराजी व्यक्त केली, परंतु काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि काही आंदोलकांनी रेल्वे व्यवस्थेविरोधात घोषणाबाजी करत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
या दरम्यान संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी रेल्वे मालमत्तेची तोडफोड केली तसेच स्थानकावरील वाहतूक विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती अधिक गंभीर झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला तसेच लाठीचार्ज केला. इशारा म्हणून हवेत गोळीबारही करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिस बंदोबस्त तैनात
या घटनेत आयजी दर्जाच्या Bihar exam special train delay अधिकाऱ्यासह अनेक पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर स्थानक परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. त्यागराजन यांनी सांगितले की, काही असामाजिक घटकांनी परिस्थितीचा गैरफायदा घेत गोंधळ वाढवला. प्रशासनाकडून आधीच दोन विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली होती, मात्र काही जणांनी आणखी ट्रेनची मागणी करत आणि आपत्कालीन साखळी ओढत परिस्थिती बिघडवली. त्यांनी असेही स्पष्ट केले की, इतर परीक्षार्थींना अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे पोलिसांना सौम्य बलप्रयोग करावा लागला.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून सर्व नियोजित विशेष ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत. रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाली असून स्थानक परिसरातील तणावही कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.