पंतप्रधान मोदींचे आवाहन पुलगावच्या चौबेचा निर्णय

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
जुने उजळवून तेच नवीन मंगळसूत्र देणार भेट!
 
पुलगाव, 
PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा सर्वसामान्य नागरिकांवर मोठा सकारात्मक परिणाम घडून आल्याचे दिसून येत आहे. येथील चौबे कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी नवीन सोन्याचे दागिने खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोबतच या कुटुंबाने लग्नात आपल्या होणार्‍या सुनेला जुने मंगळसूत्र उजळवून तेच नवे मंगळसूत्र म्हणून देण्याचे ठरवले आहे. पुलगाव इथे पूजेच्या साहित्याचे दुकान चालवणारे छोटे व्यावसायिक सतीश गौरीशंकर चौबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. राष्ट्रीय हितासाठी नागरिकांनी जबाबदारीने खर्च करावा, या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनापासून प्रेरित होत, आपल्या कुटुंबाने वधूसाठी नवीन मंगळसूत्र न खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे चौबे यांनी या पत्रात म्हटले आहे.
 
 
modi d
 
चौबे यांनी या पत्रात, त्यांचे सुपुत्र यश चौबे यांचे लग्न १ जुलै रोजी होणार आहे. त्या निमित्ताने वधूसाठी नवीन मंगळसूत्र खरेदी करण्याबाबत कुटुंबात चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या पत्नी सीमा चौबे यांनी स्वतःचेच मंगळसूत्र उजळवून आणि नव्याने घडवून ते आपल्या घरात येणार्‍या सुनेला भेट देण्याचा निर्णय घेतला. आपल्या कुटुंबासाठी हा निर्णय केवळ पैशांची बचत करण्यापुरता मर्यादित नव्हता, असेही चौबे यांनी या पत्रात लिहिले आहे. सर्वसामान्य नागरिक देखील आपल्या छोट्या-छोट्या वैयतिक निर्णयांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यात कशाप्रकारे योगदान देऊ शकतात, हे दर्शवण्याचा हा एक जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता असे त्यांनी म्हटले आहे. एका मोठ्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याच्यादृष्टीने पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणे हा आपण स्वतः निवडलेला मार्ग असल्याची भावनाही व्यत केली.
 
 
आपले कुटुंब एका साध्या मारवाडी राजस्थानी ब्राह्मण घराण्यातील असून सर्व पारंपरिक रीतीरिवाज आणि उत्साहात हा विवाह सोहळा पार पडणार असल्याचेही चौबे यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र, त्याचवेळी अनावश्यक खरेदी टाळून समाजासमोर एक आदर्श ठेवण्याची आपल्या कुटुंबाची इच्छा होती, असे चौबे यांनी या पत्रात लिहीले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी या लग्नाला यावे, असे निमंत्रणही या कुटुंबाने पंतप्रधानांना दिले आहे. आपल्याला पंतप्रधानांचे आशीर्वादाचे पत्र मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यत केली आहे. पंतप्रधानांकडून मिळणारा असा संदेश आपल्या कुटुंबासाठी एक संस्मरणीय आठवण बनेल आणि पंतप्रधानांच्या आवाहनानुसारच आपण पाऊल उचलले आहे, या आपल्या विश्वासालाही यामुळे अधिक बळ मिळेल, असे चौबे यांनी म्हटले आहे.