खासगी शाळांतील २५ टक्के जागांसाठी आरटीई अर्ज सुरू

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
नागपूर,
RTE admission आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) २००९ अंतर्गत राज्यातील खाजगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे.
 

RTE admission 
- ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. पात्र पालकांनी निर्धारित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संपूर्ण व्यवस्था डिजिटल करण्यात आली आहे.अर्ज करताना बालकाचा जन्मदाखला आणि वास्तव्याचा पुरावा अपलोड करणे बंधनकारक आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या पालकांना नोंदणीकृत भाडेकराराची प्रत सादर करावी लागणार आहे.
सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला आणि अपंगत्व प्रमाणपत्र आवश्यक राहील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचा दाखला जोडावा लागणार आहे.
 
 
१० शाळा निवडण्याची मुभा
पालकांना आपल्या पाल्यासाठी जास्तीत जास्त १० शाळांचे पर्याय निवडता येणार आहेत. पोर्टलवर गुगल मॅपच्या मदतीने निवासस्थानापासून एक किलोमीटर परिसरातील शाळांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.शासनाच्या नव्या नियमानुसार प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी बालकाचे वय ३ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. इयत्ता पहिलीसाठी किमान वय ६ वर्षांपेक्षा जास्त असावे लागणार आहे. यासाठी ३१ डिसेंबर हा मान्य दिनांक निश्चित करण्यात आला आहे.
 
 
पालकांना आवाहन
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पात्र पालकांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.