एसटी सेवेच्या बळकटीकरणासाठी आढावा बैठक
हिंगणघाट,
Sameer Kunawar येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वर्धा विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापक व संबंधित अधिकार्यांची आढावा बैठक आ. समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत बंद बसेस तातडीने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी अधिकार्यांना दिले. ग्रामीण व शहरी भागांना जोडणारी एसटी सेवा ही सर्वसामान्य नागरिकांची जीवनवाहिनी असल्याचे सांगत प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुलभ व दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध विषयांचा आढावा घेण्यात आला. वाढती प्रवासी संख्या, बसच्या वेळापत्रकाचे प्रभावी नियोजन, विविध मार्गांवरील सेवांची उपलब्धता तसेच प्रवाशांच्या सोयी-सुविधांबाबत चर्चा करण्यात आली.
विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना वेळेवर व सुसज्ज सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आ. कुणावार यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. नागरिकांच्या गरजेनुसार एसटी सेवा अधिक लोकाभिमुख व परिणामकारक करण्यावरही भर देण्यात आला. हिंगणघाट आगारात तांत्रिक कारणांमुळे बंद असलेल्या बसेसची तातडीने दुरुस्ती करून त्या पुन्हा सेवेत दाखल करण्याबाबत आमदार कुणावार यांनी अधिकार्यांना निर्देश दिले. वाढत्या प्रवासी संख्येच्या पृष्ठभूमीवर बसफेर्यांची उपलब्धता वाढवून नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
हिंगणघाट आगाराच्या नवीन इमारतीचे काम प्रगतीपथावर असून, भविष्यात प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे निर्देश आमदार कुणावार यांनी दिले. बैठकीच्या शेवटी प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाने अधिक समन्वयाने काम करावे, नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण करावे आणि एसटी सेवेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्याने कार्य करावे, असेही निर्देश आ. कुणावार यांनी दिले.