पंढरपूर
Pandharpur accident पंढरपूर परिसरात आज सकाळी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली असून म्हसवड–पंढरपूर मार्ग वर तांदूळवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात १४ भाविकांचा मृत्यू झाला आहे. सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेले हे सर्व भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दर्शनासाठी गेलेला भाविकांचा गट देवदर्शन आटोपून परतीच्या प्रवासाला निघाला असताना तांदळवाडी गाव परिसरात त्यांचा टेम्पो अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि थेट विहिरीत कोसळला. हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच मोठी जीवितहानी झाली.या दुर्घटनेत महिला आणि लहान मुलांचा समावेश असल्याचेही समोर आले असून मृतांची संख्या १४ इतकी नोंदवण्यात आली आहे. मात्र, काही जण जखमी असण्याची किंवा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. विहिरीत कोसळलेल्या वाहनातील नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र अपघाताचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याने मोठी जीवितहानी टाळता आली नाही.या घटनेमुळे माळशिरस तालुका परिसरात शोककळा पसरली असून संपूर्ण पंढरपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असून अपघाताची नेमकी कारणे शोधली जात आहेत.
मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश
या अपघाताची माहिती समोर येताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेतील मृतांमध्ये 4 लहान मुलांचा आणि 4 महिलांचा समावेश आहे. तसेच या घटनेत 2 जण बचावले असल्याचीही माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर विहिरीभोवती लोकांनी गर्दी केली आहे, सर्वजण मदतकार्यात व्यस्त आहेत. माळशिरसचे आमदार उत्तम जाणकर हे सध्या घटनास्थळी पोहचत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेवर बोलताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अपघाताची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे