मुंबई
Suraj Chavan मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा ‘बिग बॉस’ विजेता सूरज चव्हाण आता आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून, सूरज लवकरच बाबा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आनंदवार्तेवर त्याची ‘बिग बॉस’मधील जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री जाह्नवी किल्लेकर हिने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या चोरओटीचा एक खास व्हिडिओ जान्हवीने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्या व्हिडिओसोबत तिने दिलेल्या संदेशात सूरजच्या पत्नी संजना यांच्या गरोदरपणाची आनंदवार्ता जाहीर करण्यात आली. “मार्च महिन्यात पार पडलेला हा सोहळा आता शेअर करत आहे कारण ही आनंदाची बातमी आता अधिकृतपणे सर्वांसमोर येऊ शकते,” असे तिने पोस्टमध्ये नमूद केले होते. या घोषणेनंतर सूरजच्या चाहत्यांमध्ये आनंद आणि उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अलीकडेच संजना यांचा डोहाळे जेवणाचा भव्य आणि पारंपरिक सोहळा पार पडला. या सोहळ्याचे खास क्षण जान्हवी किल्लेकरने सोशल मीडियावर शेअर केले असून, “आता मी अधिकृतपणे आत्या होणार!” असा तिचा आनंद व्यक्त करणारा उल्लेख चाहत्यांच्या विशेष लक्षात आला. या कार्यक्रमात गुलाबी रंगाची साडी परिधान करून जान्हवीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, तर हातावरील मेहंदीने तिच्या लूकला अधिक उठावदार बनवले.डोहाळे जेवणात Suraj Chavan संजना यांनी हिरव्या रंगाची आकर्षक सिक्विन साडी परिधान केली होती. पारंपरिक फुलांच्या दागिन्यांनी सजलेला त्यांचा लूक आणि चेहऱ्यावर दिसणारा गरोदरपणाचा नैसर्गिक तेजस्वीपणा या सोहळ्याचे आकर्षण ठरले. दुसरीकडे, होणारे वडील सूरज चव्हाण यांनी भगवान शंकर आणि गणपती बाप्पाच्या प्रतिमांनी सजवलेला खास कस्टमाइज्ड कोट आणि पारंपरिक पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले.
सूरज चव्हाणच्या आयुष्यातील या नव्या प्रवासामुळे त्याचे चाहते आनंदित झाले असून, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. साध्या, सोज्वळ स्वभावामुळे घराघरात पोहोचलेला सूरज आता कुटुंबजीवनातील या नव्या आनंददायी टप्प्यासाठी सज्ज झाला आहे.