शिवगंगा,
gang-rape-case : तमिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यात कायद्याचे रक्षण करणाऱ्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० वर्षीय विवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबल शुक्रवारी रात्री आपली ड्युटी पूर्ण केल्यानंतर आपल्या मित्र डी. रॉबिन याच्यासोबत जेवणासाठी बाहेर गेली होती. जेवण आटोपल्यानंतर दोघेही एका निर्जनस्थळी गेले. त्यानंतर रॉबिनने महिलेचा माजी प्रियकर पी. महाराजा याच्याशी संपर्क साधून त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतल्याचा आरोप आहे.
काही वेळातच महाराजा आपल्या साथीदार हरी राजनसोबत तेथे पोहोचला. त्यानंतर महाराजाने पीडित महिलेकडे लैंगिक संबंधांची मागणी केली. मात्र महिलेने त्यास ठाम नकार दिला. तरीही आरोपींनी तिची इच्छा डावलून तिच्यावर जबरदस्ती केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर हरी राजननेही तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, आरोपी पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना पीडितेने प्रसंगावधान राखत तेथून पळ काढला. ती जवळील एका शेतातील फार्महाऊसपर्यंत पोहोचली आणि तेथील व्यक्तीला घडलेला प्रकार सांगितला. संबंधित व्यक्तीने तात्काळ पोलिसांशी आणि नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून मदत मागितली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडित महिलेची सुरक्षित सुटका केली. तिच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत डी. रॉबिन, पी. महाराजा आणि हरी राजन या तिघा आरोपींना अटक केली.
सध्या तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अशा गुन्ह्यांना सामोरे जावे लागत असल्याने समाजात संताप व्यक्त केला जात आहे.