तरुणाच्या मृत्यूने पेटला विकासनगर

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
देहरादून,
vikasnagar erupts उत्तराखंडमधील विकासनगर तालुक्यातील बैरागीवाला गावात एका तरुणाच्या हत्येनंतर परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे. किरकोळ वादातून सुरू झालेल्या संघर्षाचे रूपांतर हिंसाचारात झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आंदोलन छेडले असून आरोपीचे घरही पेटवून दिल्याची घटना घडली आहे.
 
 
vikasnagar erupts
 
मिळालेल्या माहितीनुसार, शेताला पाणी देण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. सुरुवातीला झालेली बाचाबाची काही वेळातच हिंसक संघर्षात बदलली. दोन्ही बाजूंकडून काठ्या आणि लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. या संघर्षात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर एका महिलेसह अन्य काही जण जखमी झाले.
 
 
घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली. मोठ्या संख्येने नागरिक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. आंदोलनादरम्यान परिस्थिती आणखी चिघळली आणि संतप्त जमावाने आरोपीचे घर जाळल्याची घटना घडली.
 
 
कायदोव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. परिसरात तणाव कायम असल्याने इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी संपूर्ण भागाला छावणीचे स्वरूप दिले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
 
 
दरम्यान, या हिंसाचाराचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. त्यामध्ये काही जण हातात काठ्या आणि सळ्या घेऊन धावताना तसेच एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. पोलिसांनी या फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देत मृताच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.