क्रेनचा टब खाली पडल्याने मजुराचा मृत्यू

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
विहिरीच्या खोदकामादरम्यान दुर्घटना
 
वर्धा, 
Well-digging incident विहिरीचे खोदकाम सुरू असताना अचानक क्रेनचा लोखंडी टब खाली कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना पुलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोंडी परिसरात शनिवारी घडली. रामेश्वर प्रभाकर पांचभाई (४९) रा. आकोली ता. देवळी असे मृताचे नाव आहे. रामेश्वर पांचभाई हे गेल्या काही दिवसांपासून गावातीलच गजानन बकाले यांच्या क्रेन मशीनवर मजूर म्हणून काम करत होते.
 
 
ded
 
त्यांच्यासोबत गावातील इतर मजूरही काम करत होते. सध्या चोंडी परिसरातील राजेंद्र झाडे यांच्या शेतात विहिर खोदण्याचे काम सुरू होते. घटनेच्या वेळी रामेश्वर पांचभाई यांच्यासोबत दादाराव सोनुले, खटेश्वर वाघाडे, कैलास नेहारे आणि रोशन सोनवणे हेही उपस्थित होते. शनिवारी सकाळी काम सुरू असताना रामेश्वर पांचभाई, दादाराव सोनुले आणि खटेश्वर वाघाडे हे विहिरीत उतरून माती व दगडांचा मलबा क्रेनच्या लोखंडी टबमध्ये भरत होते. भरलेला मलबा क्रेनच्या सहाय्याने वर काढला जात असताना अचानक क्रेनचा लोखंडी टब वरून खाली पडला. त्याच्या धडकेत रामेश्वर पांचभाई गंभीर जखमी झाले. दुर्घटनेनंतर इतर मजुरांनी रामेश्वर यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पुलगाव पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.