आपल्या संस्कृतीचा अभिमान ‘मल्लखांब’
यवतमाळ,
World Mallakhamb Day मल्लखांबमध्ये खेळाडू लाकडी खांबावर विविध कसरती करतात. या खेळामुळे शरीर लवचिक मजबूत आणि संतुलित राहते. हा योग आणि व्यायाम यांचा सुंदर संगम मानला जातो, अशी माहिती जागतिक मल्लखांब दिनानिमित्त यवतमाळचे मल्लखांबप्रेमी सोहम प्रशांत पेंडसे यांनी दिली.
मल्लखांबचे तीन मुख्य प्रकार आहेत, स्थिर, दोरी आणि लटकता मल्लखांब. त्यात प्रामुख्याने खेळाडू लाकडी खांबावर कसरती करतात. दोरी मल्लखांबमध्ये दोरीवर खेळ केला जातो. हा खेळ करण्यासाठी धैर्य, ताकद आणि एकाग्रता आवश्यक असते. आज या खेळाचे महत्व पटले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होतो. मल्लखांब केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि शरीर तंदुरुस्त राहते. सर्वांनी या पारंपरिक खेळाचे जतन करणे आवश्यक आहे. मल्लखांब हा आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे, असे ते म्हणाले.
मल्लखांबला ‘राजा’ असे संबोधले जाते. हा मराठी मातीतील अस्सल मराठी खेळ असून कुस्तीला दुसरा एकेरी व्यायाम प्रकार आहे मल्लखांब हा दोन शब्दांनी बनलेला आहे. एक शब्द म्हणजे मल्ल याचा अर्थ कुस्तीपटू आहे. दुसरा शब्द खांब असा आहे. महाराष्ट्रात उगम पावलेल्या या खेळाचा 15 जून हा आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन म्हणून साजरा केला जातो. या खेळामुळे आयुष्य स्पर्धात्मक बनते. या खेळाची विशेषता पहाता हा एकमेव असा खेळ आहे, ज्यात केसापासून हातापायांच्या नखापर्यंत संपूर्ण व्यायाम होतो.
या खेळामुळे शारीरिक व मानसिक व्यायाम होतो. मल्लखांबामुळे शारीरिक लवचिकता, ताकद, बौद्धिक विकास, धाडसी वृत्ती, एकाग्रता, प्रतिकारशक्ती, टाईम मॅनेजमेंट, तल्लख बुद्धी, स्वतःचा आणि साथीदाराचा तोल सांभाळणे यात खेळणारा तरबेज होतो, असे पेंडसे यांनी सांगितले. तडजोड आयोजन, मन, मेंदू चपळता, निर्णयक्षमता, चातुर्य मजबूत करून या गुणांची वाढ होऊन आपले जीवन बदलून टाकणारा हा खेळ मल्लखांब आहे. हा खेळ खेळणारा कोणताही खेळू शकतो, हे या खेळाचे वैशिष्ट्य आहे. मल्लखांबाचे पुरलेला लाकडी खांब, टांगता मल्लखांब, दोरीचा मल्लखांब, सिल्क एरियल हे प्रकार आहेत. लहान मुकांसाठी याची उंची 240 ते 260 सेंटीमीटर आणि मोठ्यांसाठी 260 ते 280 सेंटीमिटर असते. या मल्लखांबाचे कित्येक फायदे असल्यामुळे शालेय जीवनात तर हा प्रत्येकाने खेळावा असा खेळ आहे, असेही मत सोहम पेंडसे यांनी व्यक्त केले.