Yavatmal Zilla Parishad School जिल्हा परिषद शाळांच्या शैक्षणिक व्यवस्थेला बळकटी देणाèया केंद्रप्रमुख पदभरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून रिक्त असलेल्या या पदांसाठीची नियुक्ती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून जिल्ह्यातील 89 शिक्षकांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नतीची संधी मिळणार आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापनाला सक्षम नेतृत्व मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाने घेतलेल्या समूह साधन केंद्र समन्वयक तथा केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 मध्ये जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार शिक्षकांनी नशीब आजमावले होते. या परीक्षेचा निकाल 13 मार्च रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यातील रिक्त 89 पदांसाठी अडीचपट या प्रमाणात 300 गुणवत्ताधारक शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी बुधवारी जिल्हा परिषदच्या वसंतराव नाईक सभागृहात पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या सूचनेनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी धोत्रे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांच्या नियंत्रणात ही प्रक्रिया सहा चमूंनी नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली.
बहुतांश उमेदवारांनी उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेतली. जिल्ह्यातील सर्वसाधारण प्रवर्गातील 85 पदांसाठी 240 तर दिव्यांग प्रवर्गातील चार पदांसाठी 60 उमेदवारांना पडताळणीसाठी बोलावण्यात आले होते. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम निवड यादी शुक्रवारी संध्याकाळी प्रसिद्ध करण्यात आली. आता समुपदेशनाद्वारे नियुक्त्या निश्चित होणार असून त्यानंतर लगेच नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत. केंद्रप्रमुख हे शाळा आणि शिक्षण प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानले जातात. शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळांची देखरेख, उपक्रमांच्या अंमलबजावणीत त्यांची भूमिका निर्णायक असते. त्यामुळे ही पदे दीर्घकाळ रिक्त राहिल्याने निर्माण झालेली पोकळी आता भरून निघणार आहे.