जि.प. शिक्षण विभागाला मिळणार नवीन ४३ केंद्र प्रमुख

    दिनांक :14-Jun-2026
Total Views |
विभागीय स्पर्धा परीक्षेतून गुणवत्ताधारक शिक्षकांची होणार नियुती
 
वर्धा, 
Zilla Parishad Education Department जिल्हा परिषद शिक्षण विभागांतर्गत ८७ केंद्र प्रमुख पदे असून प्रत्येक केंद्रासाठी एक केंद्र प्रमुख कार्यरत असतो. यापैकी ४४ केंद्र प्रमुख पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरली जातात तर उर्वरित ४३ पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे गुणवत्ताधारक शिक्षकांमधून भरली जाणार आहे.
 
 
zp school
 
राज्य शासनाच्या निर्देशानुसार केंद्र प्रमुख पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १० जून २०२६ रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभागात १०२ उमेदवारांची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पार पडली. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक व सेवा विषयक कागदपत्रांची सखोल तपासणी करण्यात आली. कागदपत्र पडताळणीनंतर पात्र, ठरलेल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली. १५ जून रोजी समुपदेशन प्रक्रियेद्वारे ४३ केंद्र प्रमुख पदांसाठी नियुती देण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्थापन अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. विभागीय स्पर्धा परीक्षेतून गुणवत्ताधारक शिक्षकांना केंद्र प्रमुख म्हणून संधी मिळत असल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला अनुभवी व सक्षम नेतृत्व प्राप्त होईल. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासकीय कार्यक्षमता, शिक्षकांमधील प्रेरणा तसेच शाळांमधील समन्वयामध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यत केली जात आहे.
 
 
विद्यार्थी गुणवत्ता समृद्ध होईल
वर्धा जिल्हा परिषद प्रशासनाने सुरेख व प्रभावी नियोजन करीत ही प्रक्रिया कालमर्यादित वेळेत राबवत महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या नेतृत्वात शिक्षण विभागाने केलेल्या सुरेख नियोजनामुळे वर्धा जिपला आता नव्या दमाचे तरुण ४३ क्षेत्रीय अधिकारी मिळत आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात गतिमानता प्राप्त होईल व त्यामुळे विद्यार्थी गुणवत्ता समृद्ध होईल, असा विश्वास शिक्षक संघटना प्रतिनिधी, शिक्षक व पालकांकडून व्यत केला जात आहे.