मिसौरी,
12 killed in plane crash in US अमेरिकेतील मिसौरी राज्यात घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बटलर मेमोरियल विमानतळाजवळ हे विमान कोसळल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच नियंत्रण गमावले आणि ते कोसळले. अपघात इतका भीषण होता की विमानातील एकाही प्रवाशाचा जीव वाचू शकला नाही. मृतांमध्ये ११ स्कायडायव्हर्स आणि एका पायलटचा समावेश असल्याची माहिती स्थानिक आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच बचाव पथके आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, विमानाला लागलेल्या आगीमुळे ते पूर्णपणे जळून खाक झाले होते. त्यामुळे बचावकार्याला मर्यादा आल्या आणि सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड किंवा इतर कोणता घटक कारणीभूत ठरला का, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनासह राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाच्या (NTSB) अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत.तपास पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेमागील खरे कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.