उमरखेडात भेसळयुक्त खाद्यतेलाचा धुमाकूळ..?

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ : एफडीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

उमरखेड, 
Adulterated edible oil in Umarkhed शहर व परिसरात हॉटेल्स, धाबे तसेच खाद्यपदार्थ विक्रीच्या गाड्यांवर निकृष्ट दर्जाचे व भेसळयुक्त खाद्यतेल वापरले जात असल्याची चर्चा जोर धरत असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत वाढत असलेल्या संशयामुळे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 

oil  
 (संग्रहित छायाचित्र)
 
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणी एकदा वापरलेले तेल वारंवार गरम करून त्याच तेलात खाद्यपदार्थ तळले जात असल्याचा आरोप केला जात आहे. अधिक नफ्याच्या हव्यासापोटी काही व्यवसायींकडून स्वस्त, ब्रँडविरहित व संशयित भेसळयुक्त तेलाचा वापर केला जात असल्याचीही चर्चा आहे. विशेषतः शहरातील हॉटेल्स, चायनीज सेंटर, समोसा-भजे विक्रेते आणि महामार्गावरील काही धाब्यांमध्ये हा प्रकार होत असल्याचा संशय आहे. आरोग्य तज्ञांच्या मते, वारंवार वापरलेल्या तेलामुळे पचनसंस्थेचे विकार, अपचन, लठ्ठपणा, हृदयविकार तसेच इतर गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे या प्रकाराची तातडीने चौकशी करून तेलाचे नमुने तपासण्याची गरज व्यक्त होत आहे.
 
 
 दरम्यान, सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन, नगर पालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून पुरेशी तपासणी होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर नियमित छापे व नमुना तपासणी का केली जात नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासनाने केवळ कागदोपत्री कारवाई न करता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन खाद्यतेलाचे नमुने संकलित करून त्यांची शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच दोषी आढळणाèया व्यवसायींवर कठोर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी पुढे येत आहे. उमरखेड शहरासह परिसरातील सर्व हॉटेल्स, धाबे आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांवर अन्न व औषध प्रशासन आणि नगर पालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून अचानक तपासण्या कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर विषयाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
एफडीएच्या कार्यक्षमतेवर प्रश्न
भेसळखोरीवर नियंत्रण ठेवणे, अन्नपदार्थांचे नमुने तपासणे आणि दोषींवर कारवाई करणे ही अन्न व औषध प्रशासनाची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र, भेसळयुक्त खाद्यतेलाच्या वाढत्या चर्चांमुळे संबंधित विभागाकडून पुरेशी तपासणी आणि कारवाई होत आहे का, याबाबत नागरिकांमध्ये संशय व्यक्त होत असून विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.