अग्रलेख
America and Russia जगाला अमेरिका आणि रशियाच्या लष्करी शक्तीची जाणीव पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाली. या दोन्ही महायुद्धांमध्ये तथाकथित लष्करी महाशक्ती असलेल्या जगातील या दोन्ही बलाढ्य देशांच्या तोंडाला जर्मनी आणि जपानने फेस आणला होता. आपले अस्तित्व वाचविण्यासाठी दुसऱ्या महायुद्धात तर शत्रू असलेले अमेरिका-रशिया यांना एकत्र यावे लागले होते. हिटलरने ऐन हिवाळ्यात रशियावर आक्रमण करण्याची चूक केली नसती तर युरोपचा नकाशा वेगळा दिसला असता. अतिपूर्वेकडील आक्रमक जपानला रोखण्यासाठी तर अमेरिकेला अणुबॉम्बचा वापर करावा लागला होता. जर्मनी आणि जपान या दोन्ही देशांनी महाशक्तींना घायकुतीला आणले होते. पहिले महायुद्ध चार वर्षे, तीन महिने तर दुसरे सहा वर्षे सुरू होते. या दोन्ही महायुद्धांमध्ये अपरिमित मनुष्य आणि वित्तहानी झाली. अनेक देशांच्या सीमा बदलल्या. काही छोट्या देशांची निर्मिती करण्यात आली. २० व्या शतकात पहिल्या आणि दुसऱ्या या विनाशकारी महायुद्धांनंतर जगात काही सीमित संघर्ष झाले. २१ व्या शतकातील दीर्घकाळ चालणारे युद्ध म्हणजे रशिया-युक्रेन संघर्ष होय, जो अजूनही संपलेला नाही.
रशिया हा युक्रेनपेक्षा भौगोलिकदृष्ट्या तब्बल २८ पट मोठा आहे. नैसर्गिक साधने आणि लष्करी शक्तीचीही तुलना होऊ शकत नाही. एवढे सारे असूनही इवलासा युक्रेन गेली सव्वाचार वर्षे बलाढ्य रशियाशी दोन हात करतो आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झालेले हे युद्ध अजूनही संपलेले नाही. स्वतःला शक्तिशाली समजणाऱ्या रशियाच्या मर्यादा युक्रेनने उघड्या पाडल्या. केवळ लष्करी शक्तीच्या बळावर आपल्याला हवे ते प्राप्त करण्याच्या मर्यादाही जगाला दिसून आल्या. भौगोलिकदृष्ट्या रशिया आज जगातील सर्वांत मोठा देश असला तरी शेजारी देशांचा भूभाग गिळंकृत करण्याची लालसा कायम आहे. २०१४ मध्ये क्रिमिया गिळंकृत केल्यानंतर पुतिन यांची वक्रदृष्टी युक्रेनवर पडली आहे. याचा फटका बसतो आहे तो सामान्य नागरिकांना. नेमके किती सैनिक आणि नागरिक ठार झाले हे दोन्ही देशांनी अधिकृतपणे जाहीर केले नसले तरी आंतरराष्ट्रीय गुप्तचर संस्था आणि जगभरातील संघर्षांवर लक्ष ठेवणाऱ्या आणि संशोधन करणाऱ्या संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाची झालेली मनुष्यहानी प्रचंड आहे. रशियाने या युद्धात आतापर्यंत पावणे तीन लाखांच्या वर सैनिक गमावले आहेत. युक्रेनचेही १ लाख ४० हजारांच्या आसपास सैनिक ठार झाले. ब्रिटनची गुप्तचर संस्था गव्हर्न्मेंट कम्युनिकेशन्स हेडक्वार्टर्सने तर या युद्धात आतापर्यंत पाच लाख रशियन सैनिक ठार झाल्याचा दावा केला आहे. आधुनिक युगात केवळ भूभागासाठी लक्षावधी नागरिकांचा मृत्यू होण्याच्या घटनेचे वर्णन केवळ शब्दांनी करता येणार नाही. त्यात इराण- अमेरिका संघर्षाची भर पडली आहे. दुर्दैवाने या सर्व घडामोडींमध्ये संयुक्त राष्ट्र संघ दुर्बल आणि हताश झालेला आहे.
रशिया, इराण आणि अमेरिका या तीन हटवादी देशांनी जगाला वेठीस धरले आहे. युक्रेन-रशिया युद्धाचा फटका केवळ बाल्कन आणि युरोपातील काही देशांनाच बसत आहे; पण इराण-अमेरिका संघर्षामुळे अवघे जग होरपळत आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद असल्याने युरोप, आफ्रिका खंड आणि आशियातील देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे. या संघर्षाच्या केंद्रस्थानी इराण-अमेरिका-पाकिस्तान हे तिन्ही बेभरवशाचे आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे देश आहेत. एका आठवड्याच्या आत इराण शरण येईल, अशी वल्गना करणारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडाला आता फेस आला आहे. तीन महिने झाले असले तरी इराण हा देश बलाढ्य अमेरिकेसमोर पाय रोवून उभा आहे. विशेष म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आणि संघर्षात मध्यस्थाच्या भूमिकेत असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर हे सारेच बेभरवशाचे नेते म्हणून पुढे आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प दररोज विधाने बदलत आहेत. आज होणार, उद्या होणार म्हणून आज शंभर दिवस झाले तरी शांतता करार काही होण्याची चिन्हे नाहीत. ट्रम्प शांतता करार होणार-होणार असे दावे करतात; तर इराण या दाव्याचे खंडन करतो. तर दोन्ही देशांचा शांतता कराराचा मसुदा तयार आहे, लवकरच स्वाक्षरी होईल, असा दावा पाकिस्तान करीत असतो. आज या साऱ्या परिस्थितीचे अवलोकन केले असता अमेरिकेची जगात पुरती नाचक्की झाली आहे हेच खरे. अमेरिकेच्या अजेय लष्करी सामर्थ्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अमेरिकन अध्यक्षाच्या विश्वासार्हतेपुढे प्रश्नचिन्ह लागले आहे. इराणचे भवितव्य मीच ठरविणार, अशा वल्गना करणाऱ्या ट्रम्प यांना इराणने पुरते कोंडीत पकडले आहे. अमेरिकेचे पश्चिम आशियातील लष्करी तळ नेस्तनाबूत झाल्याने अरब देशांना आता तथाकथित बलाढ्य देशावरील भरवसा उरलेला नाही.
America and Russia मोठी आर्थिक किंमत मोजून उभारलेले नागरी विमानतळ, इंधन आणि वायुसाठे, गॅस पाईपलाईन्स आदी पायाभूत सुविधांची नासधूस अरब देशांना डोळ्यादेखत पाहावी लागत आहे. सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवैत हे देश संरक्षणासाठी अमेरिकेवर अवलंबून होते. पण, इराणच्या हल्ल्यांपासून अमेरिका आपल्याला वाचवू शकत नाही, याची जाणीव या अरब देशांना झाल्याने आता एक तर ते स्वतःचे सैन्य उभारतील किंवा इस्लामिक लष्करी गटाची निर्मिती करतील. सौदी अरेबियाने संरक्षणाची जबाबदारी पाकिस्तानकडे सोपविणे, हे या दिशेने पडलेले पाऊल आहे. अर्थात अमेरिकेची आतापर्यंतची लष्करी शक्ती म्हणजे झाकली मूठ सव्वा लाखाची होती, असेच म्हणावे लागेल. वर्तमान संघर्षांमुळे रशिया आणि अमेरिकेची पोलखोल झाली असून येणाऱ्या काळात जगातील भू-राजकीय समीकरणे पार बदलणार आहेत. अमेरिकेची दादागिरी आणि दबदबा डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या लहरी वर्तणुकीमुळे संपुष्टात आणला. केवळ विनाशकारी शस्त्रे भात्यात बाळगून युद्ध जिंकता येत नाही, तर ती वापरण्याचे काळीज आणि त्यानंतर होणारे परिणाम भोगण्याची हिंमतही असावी लागते. दोन जागतिक महाशक्तीच्या नांग्या ठेचल्या गेल्याने आता चीनलाही धडा मिळाला आहे. रविवारी किंवा सोमवारी इराणसोबत शांतता करार होईल, अशी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. करार झाला तरी तो पूर्णपणे अमेरिकेच्या अटी-शर्तींवर होईल, असे होणार नाही. आगीत पोळलेले हात पूर्णपणे भाजू नयेत म्हणून ट्रम्प शांतता करार करण्यासाठी धडपडत आहेत. दुसरीकडे इराणकडे आता गमावण्यासारखे फारसे काही नाही. अमेरिकेची स्थिती जागतिक गुंडासारखी आहे. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात अमेरिकेला नको असलेला इराणसोबतचा अणुकरार झाला होता. ओबामा यांनी इराणसोबतच्या तणावाचे आणि संबंधाचे चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केले होते. पण, एककल्ली, लहरी आणि गर्विष्ठ असलेले ट्रम्प यांना इराणला हाताळणे जमले नाही. वारंवार भूमिका बदलून त्यांनी स्वतःला जाळ्यात अडकवून घेतले. त्यांनी जगापुढे स्वतःच्याच देशाच्या लष्करी आणि रणनैतिक मर्यादा उघड्या पाडल्याच; शिवाय, यापुढे जागतिक रचनेत अमेरिकेचे स्थान काय असेल, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित व्हावे अशी स्थिती निर्माण केली. युक्रेनपुढे जसा रशिया उघडा पडला, तीच स्थिती इराणने अमेरिकेची केली आहे. या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी ट्रम्प धडपडत आहेत. त्यांच्या या धरसोड वृत्तीचे परिणाम जगाला भोगावे लागत आहेत. अनेक देशांमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली असून अर्थव्यवस्था डबघाईस आल्या आहेत. गेली साडेचार वर्षे इंधनाचे दर भारतात स्थिर होते. पण, पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने इंधनाचे दर वाढवावे लागले आहेत. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष लवकर संपुष्टात येण्यात जगाचे हित आहे. कधी ना कधी संघर्ष थांबेलच. तो दिवस लवकर यावा आणि महाशक्तींची मस्ती उतरवणारे संघर्ष अशी नोंद इतिहासात व्हावी एवढेच!