अमरावतीच्या कुमकुम मोहोडचा सुवर्णवेध

जागतीक धनुर्विद्या स्पर्धेत कामगिरी

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
अमरावती, 
kumkum-mohod : अंतालिया, तुर्की येथे ९ ते १४ जून दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-३ स्पर्धेत भारतीय संघाने मिक्स्ड टीम प्रकारात शानदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. भारतीय संघातील धीरज बोम्मादेवरा राय आणि खेलो इंडिया अमरावती केंद्राची प्रशिक्षणार्थी कुमकुम मोहोड यांनी अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ५-१ अशा सेट फरकाने पराभव करून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
 
 
 
jk
 
 
 
कुमकुम मोहोड ही अमरावती येथील खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रावर मागील आठ वर्षांपासून राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रफुल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करत आहे. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे आणि उत्कृष्ट प्रशिक्षणाचे हे यशस्वी फळ मानले जात आहे. यापूर्वीही कुमकुमने चीन येथे झालेल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-२ स्पर्धेत भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या सातत्यपूर्ण यशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव वाढला आहे.
 
 
 
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर, उपसंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी कुमकुमचे विशेष अभिनंदन करून तिच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर आणि अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देशपांडे यांनीही तिच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. कुमकुमची सध्याची प्रगती, जिद्द आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरी पाहता ती आगामी स्पर्धांमध्ये भारताला आणखी पदके मिळवून देईल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक प्रफुल डांगे यांनी व्यक्त केला. या सुवर्ण यशामागे कुमकुमच्या आई-वडिलांचेही मोठे योगदान असून त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचेही सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. कुमकुम मोहोडच्या या ऐतिहासिक यशामुळे अमरावती, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला अभिमान वाटत असून तिच्या पुढील यशस्वी वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता ती जुलै २०२६ महिन्यात स्पेन येथे होणार्‍या वर्ल्ड कप स्टेज-४ तसेच जपान येथे होणार्‍या २० व्या आशयाई खेळ स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनित्व करणार आहे.