मुंबई,
Bamboo Technology diploma course विदर्भातील तंत्रशिक्षण क्षेत्राला आणि बांबू उद्योगाला मोठी चालना देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेल्या मंजुरीला अनुसरून, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील प्रसिद्ध ‘बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ येथे नवीन अभियांत्रिकी पदविका संस्था सुरू करण्यास अधिकृत मान्यता दिली आहे. या संस्थेला कायम विनाअनुदानित तत्त्वावर मंजुरी देण्यात आली असून, येथे विशेषत्वाने ‘बांबू टेक्नॉलॉजी’ हा रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या प्रस्तावानंतर राज्य सरकारने या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केल्यामुळे चंद्रपूर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाची एक मोठी आणि आधुनिक संधी उपलब्ध झाली आहे.
चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात सुरू होणाèया या नवीन पदविका अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता एकूण 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता मंजूर करण्यात आली आहे. या नवीन संस्थेला ‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई’ या स्वायत्त मंडळाची संलग्नता घेणे अनिवार्य करण्यात आले असून, संबंधित परीक्षा देखील याच मंडळाच्या नियंत्रणाखाली घेतल्या जातील. सदर व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया शासनाने निश्चित केलेल्या अधिकृत प्रवेश नियमांनुसार व पद्धतीनुसार राबवली जाईल. तसेच, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या निकषांनुसार प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका आणि आधुनिक वर्गखोल्या अशा सर्व शैक्षणिक पायाभूत सोयीसुविधा पूर्ण करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित संस्थाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे.
शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे आगामी शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत या नवीन अभ्यासक्रमाचा तात्काळ समावेश केला जाणार असून, यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक बांबू संसाधनांना तांत्रिक शिक्षणाची जोड मिळून रोजगाराच्या अभूतपूर्व संधी निर्माण होणार आहेत.