कोलकाता,
rg-kar-case : कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या गाजलेल्या प्रकरणात तपासाला पुन्हा वेग आला आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने नव्याने चौकशीचे आदेश दिल्यानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष पथकाने सोमवारी आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये भेट देत तपासाची नवी फेरी सुरू केली.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयातील विविध ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये तत्कालीन प्राचार्य डॉ. संदीप घोष यांच्या कक्षाचीही तपासणी करण्यात आली. या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा किंवा काही बाबी दडपण्याचा प्रयत्न झाला होता का, याचाही तपास पथकाकडून केला जात आहे. याआधीही या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान माजी प्राचार्य संदीप घोष यांचे नाव चर्चेत आले होते.
उच्च न्यायालयाने अलीकडेच या प्रकरणातील काही बाबींची अधिक सखोल चौकशी करण्यासाठी सीबीआयला विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार संयुक्त संचालक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळ आणि संबंधित कागदपत्रांची पुन्हा तपासणी सुरू केली आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये आरजी कर मेडिकल कॉलेजच्या परिसरात एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता आणि या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी विविध स्तरांवर मागणी करण्यात आली होती.
दरम्यान, नव्याने सुरू झालेल्या चौकशीतून या प्रकरणातील अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईल, अशी अपेक्षा पीडितेच्या कुटुंबीयांसह जनतेकडून व्यक्त केली जात आहे.