औद्योगिक वसाहतीचे ७ कोटी ७४ लाखांचा मोबदला जमा

*आ. वानखेडेंच्या प्रयत्नांतून आर्वीत क्रांती

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
आर्वी, 
industrial-estate : आर्वी परिसरात औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी आ. सुमित वानखेडे यांनी पाठपुरावा केला. शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी दिल्या. त्या जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाला. आ. सुमित वानखेडे यांच्या उपस्थितीत स्थानिक तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात जमीन देणार्‍या शेतकर्‍यांना त्यांच्या मोबदला देण्यात आला. मोबदल्याचे पैसे शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाले, हे उल्लेखनिय!
 
 
j
 
विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. सुमित वानखेडे यांनी औद्योगिक क्रांती घडवून आणण्यासाठी सुरुवातीपासूनच परिश्रम घेतले. त्यांच्या पाठपुराव्याची फलश्रुती आता प्रत्यक्ष दिसू लागली आहे. आर्वी शहरात एमआयडीसी साकारण्यासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्यापोटी ७ कोटी ७४ लाख ३८ हजार ६६५ रुपये आ. सुमित वानखेडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विश्वास शिरसाट उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हरीश काळे यांच्या उपस्थितीत शेतकर्‍यांना सुपूर्द करण्यात आले.
 
 
यामध्ये पहिल्या लॉट अंतर्गत ४ कोटी ९९ लाख ३० हजार ७९८ रुपये आणि दुसर्‍या लॉट अंतर्गत २ कोटी ७५ लाख ७ हजार ८६७ रुपयांचा समावेश आहे. आ. वानखेडे यांनी १३ जून २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकल्पांना गती देण्याची मागणी लावून धरली होती. त्यापूर्वी ८ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची भेट घेऊन एमआयडीसीसाठी त्वरित खरेदी पद्धतीने जमीन अधिग्रहण प्रक्रिया महसूल विभागामार्फत जलद गतीने पूर्ण करण्याची विनंती केली. इतकेच नव्हे तर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेलारसू यांची २० डिसेंबर २०२४ रोजी भेट घेऊन तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी दूर केल्या.
 
 
१० ऑगस्ट २०२४ रोजी मुंबईतील उच्च पदस्थ अधिकार्‍यांच्या चमुसह महसूल विभागाच्या संयुत पथकाला घेऊन त्यांनी स्वतः सर्वेक्षणाच्या ठिकाणी हजेरी लावली. शेतकर्‍यांच्या शेतातील इमारती, सिंचन सुविधा, कुंपण, फळझाडे आणि वनविभागाच्या अखत्यारीतील झाडे या प्रत्येक बारीकसारीक बाबींचे अचूक मूल्यमापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचा योग्य आणि जास्तीत जास्त मोबदला मिळावा, यासाठी आ. वानखेडे उन्हातानात शेताच्या बांधावर उभे होते.
 
 
ज्या शेतकर्‍यांनी आपल्या जमिनी देऊन या प्रकल्पासाठी मोलाचे सहकार्य केले, त्यांच्याप्रती आपण नतमस्तक आहे. हा केवळ जमिनीचा मोबदला नसून आर्वीच्या विकासाचा पाया आहे, अशी प्रतिक्रिया आ. वानखेडे यांनी दिली. या एमआयडीसीच्या माध्यमातून येत्या काळात आर्वी परिसरात मोठे उद्योगधंदे उभे राहतील, ज्यामुळे हजारो तरुण-तरुणींच्या हाताला हक्काचा रोजगार मिळणार आहे.