वर्धा,
shweta-pathak : बॅचलर रोड प्रभाग ७ हा शहरातील मुख्य आणि वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावरून दिवस-रात्र नागरिकांची आणि वाहनांची मोठी वाहतूक सुरू असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरील पावडे चौक ते आर्वी नाका या भागातील अनेक पथदिवे पूर्णपणे बंद अवस्थेत आहेत. जे दिवे सुरू आहेत, त्यांचा प्रकाश अत्यंत कमी आहे. कमी प्रकाशामुळे आणि अंधारामुळे या मुख्य रस्त्यावर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बंद दिवे सुरू करून जास्त क्षमतेचे दिवे लावण्याची मागणी नगरसेवक श्वेता पाठक यांनी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
अंधारामुळे वाहनचालकांना रस्ता आणि गतिरोधक नीट दिसत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन पादचार्यांची छेडछाड, मोबाईल हिसकावणे आणि चोर्यांचे प्रमाण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून चालणे कठीण झाले असल्याने बंद असलेले सर्व पथदिवे तातडीने दुरुस्त करण्यात यावे. जुने व कमी प्रकाशाचे दिवे बदलून त्या ठिकाणी अधिक क्षमतेचे नवीन प्रखर दिवे लावण्यात यावेत. हा सार्वजनिक सुरक्षेचा अत्यंत गंभीर विषय असल्याने सकारात्मक कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे.