होर्मुझ खुलण्याच्या घोषणेनेच तेलात घसरण

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
तेहरान, 
Drop in oil prices जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका आणि इराणमधील तणावाला अखेर पूर्णविराम मिळाला असून दोन्ही देशांमध्ये व्यापक शांतता करार झाला आहे. या ऐतिहासिक कराराची घोषणा करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील अमेरिकेची नौदल नाकेबंदी तात्काळ हटवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा सागरी मार्ग पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाला आहे.  या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय तेलबाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने घसरण झाली असून ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे ४ टक्क्यांनी घसरून ८३ डॉलर प्रति बॅरलवर आली आहे. त्याचवेळी अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) तेलाच्या किमतींमध्ये ४.६ टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली गेली. मूरबान क्रूडचे दरही ८३ डॉलरच्या आसपास पोहोचले आहेत.
 
 

Drop in oil prices 
 
शांतता कराराची घोषणा करताना ट्रम्प यांनी जगभरातील व्यापारी जहाजांना संदेश देत तेलाचा पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू होणार असल्याचे सांगितले. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये हा करार पूर्ण झाल्याचे जाहीर करत होर्मुझ सामुद्रधुनी निर्बंधमुक्त करण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे गेल्या काही महिन्यांपासून जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा ताण निर्माण झाला होता. होर्मुझ सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणावर तेल आणि वायूची वाहतूक होत असल्याने हा मार्ग बंद झाल्यानंतर अनेक देशांमध्ये इंधन दर वाढले होते. कच्च्या तेलाच्या किमती १०० ते ११५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याने पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या दरांवरही त्याचा परिणाम झाला होता. आता शांतता करारामुळे आणि होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा सुरू झाल्याने जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिका-इराण करारामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला दिलासा मिळाला असून ऊर्जा बाजारातील अनिश्चिततेचे ढगही काही प्रमाणात दूर झाले आहेत.