वॉशिंग्टन,
Famous singer dies in helicopter crash जागतिक संगीतविश्वाला हादरवणारी एक दु:खद बातमी समोर आली आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीने आणि लोकप्रिय गाण्यांनी लाखो चाहत्यांची मनं जिंकणारे अमेरिकन गायक ऑलिव्हर ट्री यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले. ते अवघे ३२ वर्षांचे होते. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे घडलेल्या या दुर्घटनेमुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी रिओ दि जानेरोच्या पश्चिम भागात दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही हेलिकॉप्टरमधील सहा जणांचा मृत्यू झाला. ऑलिव्हर ट्री हे मृतांमध्ये असल्याचे अनेक वृत्तसंस्थांनी म्हटले असून दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू आहे.

ऑलिव्हर ट्री हे त्यांच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वासाठी, वैशिष्ट्यपूर्ण हेअरस्टाइलसाठी आणि वेगळ्या संगीत शैलीसाठी ओळखले जात होते. 'व्हेन आय एम डाऊन', 'एलियन बॉय', 'लाइफ गोज ऑन' आणि 'मिस यू' यांसारख्या गाण्यांमुळे त्यांनी जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या गाण्यांना अब्जावधी वेळा ऐकले गेले असून सोशल मीडियावरही त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. कॅलिफोर्नियामध्ये जन्मलेल्या ऑलिव्हर ट्री यांनी आपल्या संगीत कारकिर्दीत अनेक प्रयोग केले. त्यांनी केवळ गायनच नाही तर स्वतःच्या म्युझिक व्हिडिओंचे लेखन आणि दिग्दर्शनही केले. त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे ते इतर कलाकारांपेक्षा वेगळे ठरले आणि तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय झाले. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर जगभरातील चाहते आणि कलाकारांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली. एका वेगळ्या विचारसरणीचा आणि सर्जनशीलतेचा कलाकार गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. ऑलिव्हर ट्री यांच्या अकाली निधनाने संगीतविश्वाने एक अनोखा आवाज गमावला आहे.