वेध
Farm laborer शेती करणे आज कठीण झाले आहे. याची अनेक कारणे असली तरी महत्त्वाचा मुद्दा शेतमजुरांचा आहे. पैसा देऊनही शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी शेती करणेच सोडून देत आहेत. या परिस्थितीत समजा शेतमजुरांना समाजासह शासनाकडून रुतबा मिळाल्यास ते पुन्हा शेताकडे वळतील. कारण प्रत्येकाला पैशांसह मानसन्मान हवा असतो. शेतमजुरांना पैसा सोडा रुतबाही मिळत नाही. शिवाय अंत्योदय योजनेमार्फत ८० कोटी कुटुंबांना मोफत धान्य मिळत असल्याने त्यांची काम करण्याची इच्छाच संपुष्टात आली आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास भविष्यात आपली लोकसंख्या २०० कोटी राहील पण शेतमजूर आपल्याला परदेशातून आयात करावे लागतील.
हाताला काम नाही म्हणून खेडे बकाल झाले आहेत. रोजगारासाठी युवक-युवतींचे शहराकडे पलायन सुरू आहे. तर तिकडे शेतात शेतमजूर मिळत नसल्याने शेतकरी रडत आहेत. हा विरोधाभास सुरू राहिल्यास शेती कशी पिकणार, याचा विचार करावाच लागेल. संपूर्ण देशात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन सुरू आहे. त्याअनुषंगाने एका वर्षात १२५ दिवस रोजगार देण्याची हमी यामाध्यमाने दिली आहे. पण सरकारने हमी दिली, मात्र काम करणारे त्याकरिता तयार नाहीत. आराम हराम आहे. हे शाश्वत सत्य माहीत असूनही ग्रामीण भागात शेतीत रोजगार हाती असतानाही बेरोजगारांची फौज पानटपरीवर टाईमपास करताना दिसते. हा प्रकार चिंताजनक आहे. तेव्हा सरकारने श्रमाला प्रतिष्ठा मिळेल, अशा स्वरूपाची संकल्पना प्रत्यक्षात आणायला हवी. रोजगार हमी योजनेच्या माध्यमाने नाल्या खोदणे, रस्त्याचे बांधकाम करणे सोडून आता त्यांना सरसकट शेतीच्या कामात लावायला हवे. शेतकरी जगला तरच देशातील जनता पोटभर भोजन करेल. अन्यथा लोकांना उपाशी राहावे लागेल. शेतमजूर मिळत नसल्याचे कारण अंत्योदय योजना सांगितले जाते. पण ते एक छोटेसे कारण आहे. त्यापेक्षा मोठे कारण शेतमजुरांना तो रुतबाच मिळालेला नाही. सरकारी अधिकारी, डॉक्टर, इंजिनीअर, वकील, तहसील कार्यालयातील साध्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्यालाही समाजाने रुतबा दिलेला आहे. तो रुतबा शेतमजुरांना दिलाच नाही. मजूर म्हणताच १०० पैकी ९९ लोक नाक मुरडून त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतात. मग कसे वाढणार शेतमजूर, यावर कधीतरी चिंतन केले आहे का? आपण चापलुसी करून श्रेय लाटणार्या शोभाराम सुगंधींना रुतबा दिला, पण शरीराने मेहनत करणार्यांना मानसन्मान देणे टाळले. त्यांना तुच्छ वागणूक दिली. आज शेतमजूर न मिळण्याचे तेच कारण आहे.
क्रिकेटमध्ये पैसा आणि रुतबा आहे. म्हणूनच कोट्यवधी मुले-मुली जीवाचे रान करतात. डॉक्टर, इंजिनीअर होणे प्रतिष्ठेसह पैसा कमावण्याचे माध्यम आहे. म्हणूनच त्याकरिता जीवाचा आटापिटा केला जातो. तशी मेहनत शेतमजूर बनण्यासाठी का नाही? कारण त्यात पैसा, रुतबा आणि सुरक्षाही नाही. मग कशाला कुणी शेतमजूर बनणार, याचा विचार व्हायला हवा. शेतमजूर होणे कुठल्याही येड्याचे काम नाही. त्यातही कसब लागतात. त्यातही शारीरिक व मानसिक शक्तीची कसोटी लागते. त्यात ऊन, वारा, पाऊस झेलण्याची ताकद हवी असते. वीज कडाडत असताना शेतात राबावे लागते. साप, विंचू, वन्यप्राण्यांची भीती झुगारून देशवासीयांसाठी घाम गाळावा लागतो. जेव्हा शेतमजूर घाम गाळतो तेव्हाच धान्यरूपी सोनं पिकते. म्हणूनच आता समाजाने त्यांना लोकाश्रय द्यावा अन् सरकारने राजाश्रय देत शेतमजूर म्हणवून घेणे गौरवपूर्ण ठरेल, असा एखादा निर्णय घ्यावा. श्रमाला रुतबा मिळाला तरच शेतमजुरांची फौज वाढेल. गावखेड्यात पूर्वी गुराखी राहायचे. ते आता नामशेष झाले. परिणामी गाईंची कत्तलखान्याकडे वाटचाल वाढली. शेतीपूरक व्यवसाय संपुष्टात आला. शेणखत मिळणेही कठीण झाले. समजा गुराख्यांना श्रमप्रतिष्ठा समाजाने दिली असती तर लाखों गाईंचे प्राण वाचले असते. भरपूर दूध मिळत राहिल्याने भेसळ करण्याची गरज भासली नसती. पण समाजच चुकला अन् सर्व जण गोत्यात आले. या चक्रव्यूहातून बाहेर पडायचे असेल तर श्रमाला प्रतिष्ठेसह रुतबा द्यावा लागेल. अर्थात ‘तुमचा पैसा आमचे श्रम । तुमची बुद्धी आमुचा उद्यम। एकाचा घोडा एकाचा सरंजाम। असावा जैसा ।। मुळीं जीवनाची तैसीच रचना । एकास हात लागती नाना। सर्वां मिळोनीच हा आपुल्या स्थानां । बनतो सन्मान घ्यावया ।।’ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचारच आपल्याला तारतील.
- अनिल उमाकांत फेकरीकर
९८८१७१७८५९