वर्धा,
shankarbaba-papadkar : प्रशासनाची शेतकरी सहायक धोरणे समाज आणि परिवाराच्या पाठिंबा या दोन गोष्टीच शेतकरी आत्महत्या रोखू शकतात असे प्रतिपादन पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांनी केले.
स्थानिक सत्यनारायण बजाज वाचनालय येथे रविवार १४ रोजी वर्धा सोशल फोरमच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क बी-बियाणे वाटप तसेच क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळा २०२६ या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिपच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी वैशाली शिंदे यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे, सचिव अविनाश सातव उपस्थित होते.
डॉ. ज्ञानदा फसणे यांनी वर्धा सोशल फोरमच्या उपक्रमाचे कौतुक केले व पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले. वैशाली शिंदे यांनी घन कपाशी लागवडची तसेच या वर्षी पेरणीकरण्याची घाई करू नये असा सल्ला दिला. या कार्यक्रमात पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांचा सत्कार करण्यात आला. मनीषा मेघे यांनी मानपत्राचे वाचन केले.
पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथालयातील अंध विद्यार्थिनी गांधारी हिने आपल्या सुरेल आवाजात गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिचा यावेळी विशेष सत्कारही करण्यात आला.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या चार महिलांचा क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार २०२६ देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये डॉ. चेतना सवाई, तबस्सुम आझमी, कांचन रघटाटे आणि अश्विनी रवी काळे यांचा समावेश आहे. वर्धा सोशल फोरमकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी राबविण्यात येणार्या या उपक्रमाचे हे अकरावे वर्ष आहे. यावेळी रवी शेंडे, शैलेंद्र दप्तरी, चंदू ठक्कर, सुनील तापडिया तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नि:शुल्क बी-बियाणे वाटप करण्यात आले.
यशस्वीतेसाठी आसिफ जाहिद, सौरभ ढोमणे, ब्रिजकिशोर पंड्या, राहुल अवथनकर, प्रदीप बजाज, संजय मानमोडे, दिलीप कठाने, महेश गुल्हाने, श्रीकांत राठी, चंद्रशेखर राठी, श्रीकांत काशीकर, रवींद्र टप्पे, हरिष जोतवानी, डॉ. जयंत मकरंदे तसेच शिव प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष सहकार्य केले.
संचालन पल्लवी पुरोहित यांनी केले तर आभार श्याम परसोडकर यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.