नोएडा,
flight from Jewar Airport पश्चिम उत्तर प्रदेशातील लाखो नागरिकांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्थात जेवर विमानतळावरून पहिले व्यावसायिक विमान उड्डाण करत इतिहास घडवला. या विशेष उड्डाणात विमानतळासाठी जमीन उपलब्ध करून देणाऱ्या १७२ शेतकऱ्यांचा सन्मानपूर्वक समावेश करण्यात आला होता. इंडिगोचे हे विमान लखनौकडे रवाना झाले आणि विमानतळाच्या नियमित सेवांना अधिकृत सुरुवात झाली. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू उपस्थित होते. त्यांनी या प्रकल्पात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शेतकऱ्यांचे योगदान गौरवत पहिल्या उड्डाणात त्यांना स्थान देण्यात आल्याचे सांगितले. लखनौमध्ये पोहोचल्यानंतर या शेतकऱ्यांची भेट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी घडवून आणण्याचेही नियोजन करण्यात आले होते.

याच दिवशी सकाळी लखनौहून आलेले इंडिगोचे विमान जेवर विमानतळावर यशस्वीरित्या उतरले आणि विमानतळाच्या व्यावसायिक कामकाजाचा शुभारंभ झाला. या नव्या विमानतळावरून लखनौसह बंगळुरू, हैदराबाद आणि अमृतसर या शहरांसाठीही विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की, नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या काही वर्षांत देशातील सर्वात महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक ठरेल. हा प्रकल्प केवळ उत्तर प्रदेशचीच नव्हे, तर संपूर्ण उत्तर भारताची हवाई कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यास मदत करेल. व्यापार, उद्योग, पर्यटन आणि रोजगार निर्मितीला यामुळे मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विमानतळाचा विस्तार टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून १ जुलैपासून आणखी अनेक शहरांसाठी नियमित विमानसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. जयपूर, भोपाळ, चंदीगड, बरेली, डेहराडून आणि नवी मुंबई यांसारख्या शहरांचा त्यात समावेश असेल. सुरुवातीच्या टप्प्यात इंडिगो आणि अकासा एअर या कंपन्या सेवा देणार आहेत.उत्तर प्रदेशमधील पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून जेवर विमानतळाची नोंद झाली असून, या प्रकल्पामुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील नागरिकांना दिल्ली विमानतळावर अवलंबून राहण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भविष्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शहरांशी थेट हवाई संपर्क निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.