धारणी,
patlya-guruji-passed-away : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ, एकनिष्ठ नेते पटल्या गुरुजी मावस्कर यांचे सोमवार १५ जून रोजी पहाटे अमरावती येथील चौधरी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने मेळघाट परिसरासह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक पटल्या गुरुजी मावस्कर यांनी सन १९९४ ते १९९९ या कालावधीत मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्य केले होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. मेळघाटासह राज्यभरातून शोकसंदेशांचा वर्षाव होत आहे.
सोमवारी दुपारी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी ५ वाजता धारणी येथील सिव्हील लाईन परिसरातील त्यांच्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर धारणी येथील हिंदू मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमरावती येथील चौधरी रुग्णालयात जाऊन पार्थिवाचे दर्शन घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. पटल्या गुरुजी यांच्या पश्चात त्यांचे पुत्र भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचे माजी संचालक तथा अमरावती विभागीय अन्न पुरवठा विभागाचे माजी उपायुक्त रमेश मावस्कर, भाजपा कार्यकर्त्या सून रेखा मावस्कर तसेच मोठा परिवार आहे. रमेश मावस्कर हे देखील भारतीय जनता पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत.