बेगुसराय,
girls created using AI in Bihar बिहारच्या बेगुसरायमध्ये सायबर गुन्ह्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांचे बनावट अश्लील फोटो तयार करून ब्लॅकमेलिंग केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याच्या मोबाईल आणि डिजिटल उपकरणांमधून सुमारे 200 मुलींचा डेटा जप्त करण्यात आला आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून महिलांचे फोटो डाउनलोड करत होता. त्यानंतर एआय आधारित एडिटिंग टूल्सचा वापर करून त्या फोटोंमध्ये बदल करून आक्षेपार्ह आणि बनावट स्वरूपातील प्रतिमा तयार केल्या जात होत्या. हे फोटो इतके वास्तवदर्शी वाटत होते की सामान्य व्यक्तीला ते खरेच आहेत असे वाटावे.

या बनावट फोटोंचा वापर करून आरोपी संबंधित महिलांना धमकी देत होता. हे फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची भीती दाखवून तो पैशांची मागणी करत होता. काही प्रकरणांमध्ये मानसिक दबाव टाकून ब्लॅकमेलिंग करण्याचाही प्रयत्न झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर सायबर सेलने स्थानिक पोलिसांसह संयुक्त कारवाई सुरू केली. आरोपीच्या मोबाईल आणि इतर डिजिटल साधनांची तपासणी केली असता अनेक संशयास्पद फोटो, एडिटिंग अॅप्स आणि सोशल मीडिया अकाउंट्सशी संबंधित माहिती मिळाली. सध्या डिजिटल फॉरेन्सिक टीम पुराव्यांचे सखोल विश्लेषण करत असून आणखी पीडितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
तज्ज्ञांच्या मते, एआ य तंत्रज्ञानामुळे अशा प्रकारचे सायबर गुन्हे झपाट्याने वाढत आहेत. डीपफेक आणि बनावट फोटो-व्हिडिओ तयार करून व्यक्तींची प्रतिमा खराब करण्याचे प्रकार गंभीर धोका निर्माण करत आहेत. यामुळे केवळ मानसिक त्रास नाही तर सामाजिक प्रतिष्ठा आणि आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणात होऊ शकते. पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर फोटो शेअर करताना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद ऑनलाइन धमकी किंवा ब्लॅकमेलिंग झाल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.