दोन कारची समोरासमोर धडक

एक जन जखमी

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
कारंजा लाड, 
collision-between-two-cars : कारंजा-अमरावती मार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला. या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. धडकेची तीव्रता इतकी जबरदस्त होती की एका कारने पलटी घेतली, तर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 
 
k
 
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विरुद्ध दिशेने येणार्‍या दोन चारचाकी वाहनांची अचानक समोरासमोर टक्कर झाली. धडकेचा आवाज परिसरात मोठ्या प्रमाणात घुमल्याने स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच दादाजी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेचे चालक संदेश मेश्राम यांनी तत्परता दाखवत जखमी व्यक्तीला तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमीवर प्राथमिक उपचार केले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
 
 
या अपघातात एका कारने पलटी घेतल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वाहनांमधील प्रवाशांना गंभीर दुखापत न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मोठ्या अपघाताचे स्वरूप असतानाही जीवितहानी टळल्याने हा एक प्रकारे चमत्कारच मानला जात आहे. अपघातामुळे काही काळ अमरावती मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. अपघातग्रस्त दोन्ही वाहनांचे समोरील भाग पूर्णपणे चुराडा झाल्याचे दिसून आले. सुदैवाने मोठी जीवितहानी टळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी या भीषण अपघाताने वाहनचालकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.