भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या केलं चीत!

    दिनांक :15-Jun-2026
Total Views |
बर्मिंगहॅम,
ind-vs-pak : भारतीय संघाने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध गट 'अ' मधील पहिला सामना ६४ धावांनी जिंकून शानदार सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना भारताने १७० धावा केल्या, त्यानंतर पाकिस्तानचा संघ १०६ धावांवर सर्वबाद झाला. दीप्ती शर्माच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाच बळी घेत सामना जिंकला.
 
 

ind
 
 
 
दीप्ती आणि श्री चरानीच्या गोलंदाजीच्या तडाख्यात पाकिस्तानी संघ सापडला
 
 
भारताविरुद्ध १७१ धावांचे लक्ष्य गाठताना पाकिस्तानी संघाने वेगवान सुरुवात केली. मुबिना अली आणि गुल फारूक या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. पाचव्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या दीप्ती शर्माने गुल फारूकला १२ धावांवर बाद करून पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर, पाकिस्तानी संघाच्या एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या आणि ७७ धावांवर त्यांचा निम्मा संघ तंबूत परतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी त्यांना पुनरागमन करण्याची कोणतीही संधी न देता पाकिस्तानी संघाला १७ षटकांत १०६ धावांवर रोखले. या सामन्यात दीप्ती शर्माने पाच, तर श्री चरणीने तीन आणि शफाली वर्माने एक बळी घेतला.
 
 
 
 
मंधानाने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवले
 
 
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. १८ धावांवर पहिल्या दोन विकेट गमावल्यानंतर, स्मृती मंधानाने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली आणि टीम इंडियाला मजबूत स्थितीत आणले. या सामन्यात स्मृती मंधानाने ४४ चेंडूंमध्ये ६८ धावा केल्या, तर हरमनप्रीत कौरनेही ३६ धावा केल्या. डावाच्या शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला आलेल्या रिचा घोषने केवळ १७ चेंडूंमध्ये ३४ धावांची आक्रमक खेळी करत टीम इंडियाला १७० धावांपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय संघ आता या टी-२० विश्वचषकातील आपला पुढील सामना १७ जून रोजी हेडिंग्ले येथे नेदरलँड्सच्या महिला संघाविरुद्ध खेळेल.