मुंबई
monsoon alert राज्यात मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान विभागाने पूर्वी १५ जून २०२६ ही संभाव्य तारीख जाहीर केली होती. मात्र प्रत्यक्षात मान्सूनची प्रगती अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नसून सध्या तो अरबी समुद्रातच रेंगाळलेला आहे. अफगाणिस्तानकडून आलेल्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीत अडथळा निर्माण झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, मान्सून २० जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र ही वेळही अद्याप अंदाजावर आधारित असून परिस्थितीवर सतत नजर ठेवली जात आहे. याआधी दिलेला १५ जूनचा अंदाज चुकल्याने आणि मान्सून पुढे सरकला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी शेतांची पूर्वतयारी पूर्ण केली आहे. नांगरणी झालेली आहे, बियाणे आणि खतेही घरात आणून ठेवण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्ष पाऊस न पडल्याने पेरण्या सुरू होऊ शकलेल्या नाहीत. “वरूण राजा” अद्याप बरसला नसल्याने शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.दरम्यान, प्रशांत महासागरातील एल निनो स्थिती सक्रिय असल्याने यंदाच्या मान्सूनवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यासह देशातील खरीप हंगामाबाबत अनिश्चितता वाढली आहे.मान्सून २० जूनपर्यंत राज्यात दाखल झाल्यानंतर कृषी विभागाकडून अधिकृत पेरणीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कृषी विभागाने स्पष्टपणे आवाहन केले आहे की, अधिकृत सूचना मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. सध्या पेरणी केल्यास पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून योग्य वेळेची घोषणा झाल्यानंतरच पेरण्या कराव्यात, असे सांगितले आहे.
सध्या मान्सून अरबी समुद्रात स्थिरावलेला असून पुढील काही दिवसांत त्याची पुढील हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राज्यात पूर्णपणे पावसाचे आगमन होईपर्यंत पेरणी थांबवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीबाबत शेतकरी वर्गात चिंता कायम आहे.