दौंड,
jaggery production Maharashtra दौंड तालुक्यातील गुऱ्हाळ व्यवसाय सध्या अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईनंतर तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नोटिसांमुळे तालुक्यातील सुमारे ४०० गुऱ्हाळघरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे हजारो टन ऊस गाळपाअभावी पडून राहिला असून शेतकरी, ऊस पुरवठादार आणि गुऱ्हाळ व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दौंड तालुक्यातील साखर कारखाने बंद असतानाही दररोज जवळपास एक हजार टन उसाचे गाळप गुऱ्हाळघरांवर केले जात होते. एकेकाळी स्थानिकांच्या मालकीचा आणि नियंत्रणाखाली असलेला हा व्यवसाय कालांतराने मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय चालकांच्या ताब्यात गेला आहे. सध्या काही अपवाद वगळता तालुक्यातील बहुतांश गुऱ्हाळघरे परप्रांतीयांकडून चालवली जात आहेत.
गेल्या आठवड्यात अन्न व औषध jaggery production Maharashtra प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली खामगाव आणि बोरीपार्धी परिसरातील गुऱ्हाळघरांवर छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईत सुमारे १७ लाख रुपयांचा निकृष्ट व भेसळयुक्त गूळ जप्त करण्यात आला. या घटनेनंतर ६ जून रोजी बोरीपार्धी येथील बोरमलनाथ मंदिरात गुऱ्हाळ चालक आणि मालकांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अन्न व औषध प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून भेसळमुक्त व शुद्ध गूळ निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.मात्र, शुद्ध गूळ उत्पादनासाठी वाढणारा खर्च आणि उसाच्या खरेदी दरामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. सध्या शेतकऱ्यांना उसासाठी प्रतिटन ४ हजार ते ४ हजार २०० रुपये दर मिळत आहे. हा दर कायम ठेवण्याची मागणी शेतकरी आणि ऊस पुरवठादारांकडून होत आहे. दुसरीकडे, शुद्ध गूळ निर्मिती आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी उसाचा दर प्रतिटन ३ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी करण्याची मागणी परप्रांतीय गुऱ्हाळ चालकांनी केली आहे. या मुद्द्यावरून गुऱ्हाळ व्यवसायातील चालक आणि मालक संघटनांमध्ये मतभेद निर्माण झाले असून दोन गट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.दरम्यान, विषारी दारू निर्मितीसाठी आवश्यक साहित्य काही गुऱ्हाळांमधून पुरवले जात असल्याच्या संशयावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्व गुऱ्हाळ मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. बेकायदेशीर दारू निर्मितीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या कृत्यात सहभाग आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या नोटिसांमधून देण्यात आला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मार्ग काढण्यासाठी केडगाव येथील म्हसोबा मंदिर परिसरात गुऱ्हाळ चालक, ऊस पुरवठादार आणि वाहतूकदार यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे. उसाच्या दरासह विविध प्रलंबित प्रश्नांवर या बैठकीत तोडगा निघतो का, याकडे शेतकरी आणि गुऱ्हाळ व्यवसायिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गुऱ्हाळघरे बंद राहिल्यास ऊस उत्पादकांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.