बुलढाणा,
loan-waiver-crop-insurance : राज्यातील शेतकर्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना जाहीर केली असली तरी या योजनेतील अटी व निकषांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत आहे. ही कर्जमाफी शेतकर्यांच्या हिताची नसून शेतकर्यांसाठी अन्यायकारक आहे, त्यामुळे या कर्जमाफीच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कर्जमाफी आणि शेतकर्यांच्या हक्काचा पीक विमा मिळावा यासाठी १५ जून पासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन त्यांच्या निवास्थानी सुरु केले आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्य सरकारने शेतकर्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली परंतु ही कर्जमाफी शेतकर्यांना दिलासा देणारी नसून उलट संकटात टाकणारी आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
या कर्जमाफी योजनेत लादलेल्या अटी शेतकर्यांना कर्जमाफी पासून वंचित ठेवत असल्याने ही कर्जमाफी फसवी आणि अन्यायकारक असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी आणि उर्वरित पीक विमासाठी लवकरच राज्यभर आंदोलन करणार, असा इशारा रविकांत तुपकर यांनी गेल्या आठवड्यात दिला होता.
चार दिवसांपूर्वी जळगाव जामोद येथे फसव्या कर्जमाफीचा निषेध करून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. याच मोर्चाला संबोधित करताना रविकांत तुपकर यांनी कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन छेडणार असल्याची घोषणा केली होती. दि. १५ जून रोजी सकाळी ९ वाजल्यापासून रविकांत तुपकर त्यांच्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत.